धक्कादायक ! रात्रीच्या वेळी महिलेवर हल्ला, डोळा झाला निकामी

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर तालुक्याच्या न्हावरे येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्री उशिरा शौचास गेलेल्या एका शेतमजूर महिलेवर अज्ञात व्यक्तीने हल्ला करून तिचा एक डोळा काढला तर एका डोळ्याला अत्यंत गंभीर स्वरूपाची दुखापत केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी अज्ञात इसमावर शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली आहे.

सदर घटना 3 नोव्हेंबर रात्री नऊ ते साडे नऊच्या दरम्यान घडली आहे.यामध्ये मुक्ता राजू चित्रे (वय ४५वर्ष ,रा.बिडगर – सूर्यवंशी वस्ती,न्हावरे,ता.शिरुर,जि. पुणे) या महिलेवर अज्ञात हल्लेखोराने हल्ला करून तिचा एक डोळा काढला आहे. तर दुसऱ्या डोळ्याला गंभीर स्वरुपाची दुखापत केली आहे.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती नुसार 3 नोव्हेंबर रात्री नऊच्या दरम्यान सदर शेतमजूर महिला घरापासून शंभर फूट अंतरावर शौचास गेली असता त्याठिकाणी एक अनोळखी अज्ञात इसम आला असता सदर महिलेने तुला आई बहीण नाही का असे म्हटल्यानंतर सदर इसमास राग आल्याने त्याने तू कुठली आहेस कुठे राहते असे म्हणून महिलेस मारहाण करून डोक्याचे केस धरून जमिनीवर आपटले व कुठल्यातरी धारदार शस्त्राने तिच्या उजव्या डोळ्यावर हल्ला करून डोळा बाहेर काढला. हल्ल्याचे स्वरूप इतके गंभीर होते की, या महिलेचा एक डोळा जमिनीवर पडलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. तर दुसऱ्या डोळ्याला गंभीर दुखापत केली.

याबाबत सदर महिलेला तात्काळ ससून येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बिरदेव काबुगडे करीत आहे.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेउन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डाॕ. अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते,शिरुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे, पोलिस उपनिरीक्षक भगवान पालवे सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरुदेव काबुगडे, प्रविण राऊत, विकास कापरे अदिनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करुन तपासाच्या दिशेने सुत्र हलवली. तसेच पोलिस अधीक्षक डाॕ. अभिनव देशमुख यांनी पोलिस यंत्रणेला गुन्ह्यातील गांभीर्य लक्षात घेता तपासाच्या दिशेने कारवाईसाठी योग्य मार्गदर्शन केले.