30 वर्षांचं ‘ओझं’ उतरवलं, भाजपासाठी आता दरवाजे ‘कायम’चे बंद !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – युती आता कायमची संपली असून भाजपने कितीही प्रयत्न केले तरी आता परतीचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतच गेली ३० वर्षे खांद्यावरचे ओझे फेकून दिल्याची घोषणा केली. त्यामुळे मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांंच्या शक्यताना आता पूर्ण विराम दिला आहे, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपावर करण्यात आली आहे.

शिवसेनेने म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मायबापांनी शब्द पाळला नाही आणि महाराष्ट्रात त्यांच्यावर राजकीय बेकार होण्याची वेळ आली. आता तर शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून दिल्याची घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे ओठास लाली व तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकीही बंद करून घ्यावी. कोणतेही नाते उरलेले नाही. नात्यांचेही तसे ओझेच होते. तेही उतरले. ओझे उतरले!

यात पुढे म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाचे ३० वर्षांचे ओझे उतरवले असल्याची शुभवार्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे! हा प्रयोग गेली ३० वर्षे चालला होता. आता हे ओझे उतरवल्याची अधिकृत घोषणा नागपूरच्या विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनीच हे जाहीर केल्यामुळे भारतीय जनता पक्षाने खिडकीत बसून शुक शुक करणे, शीळ मारून लक्ष वेधून घेणे, दरवाजे उघडे आहेत, आम्ही आजही वाटाघाटीस तयार आहोत, अशी डबडी वाजविणे बंद करावे.

नागपूरच्या अधिवेशनात काही मंडळींनी टोकाची वक्तव्ये केली. आम्ही फार काळ विरोधी पक्षात बसणार नाही. पुढच्या अधिवेशनात आम्ही पुन्हा सत्तेवर असू अशी फेक विधाने करूनही नागपूरच्या थंडीत राजकीय हवा गरम झाली नाही. भाजपचे ओझे फक्त शिवसेनेनेच उतरवले नाही तर भाजपची सत्ता एकदाची गेल्यामुळे महाराष्ट्राच्या मनावरील ओझेही उतरले व हवा मोकळी झाल्याचे वातावरण निर्माण झाले, अशी खरपूस टीका सामनातून करण्यात आली आहे.

आज नागपुर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी पक्ष विदर्भाचा प्रस्ताव मांडणार आहेत. तर विरोधी पक्ष हे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचा अंतिम आठवडा प्रस्ताव देणार आहेत. शिवाय राज्य सरकार जीएसटी सुधारणा विधेयक मांडणार आहे. यामुळे आज पुन्हा सत्ताधारी आणि विरोधीपक्षात जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/