‘त्या’ बैठकीत अजितदादा फोनवर chatting करत होते, त्यानंतर फोन Switch-off झाला, अन्….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती झाल्यानिमित्त सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. याचदरम्यान आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यामागे महत्वाची भूमिका बजावलेल्या शिवसेनेचे नेते संजय राऊत (shiv-sena-leader-sanjay-raut) यांनी सामनातील एका लेखातून महाविकास आघाडीच्या सत्तावाटपाच्या वेळी घडलेला बैठकीतील एक प्रसंग सांगितला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माझ्यात राज्यात आघाडीचे सरकार स्थापन करण्यासंदर्भात गाठीभेटी सुरु होत्या. सरकार स्थापनेसंदर्भात काँगेसचा स्पष्ट होकार आला नव्हता. मात्र काँग्रेसचे नेते स्वर्गीय अहमद पटेलांसारखे नेते सकारात्मक बोलत होते. 22 नोव्हेंबरला नेहरू सेंटरमध्ये बैठीकला सुरुवात झाली. बैठकीत वाटाघाटीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली. विधानसभेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाता कामा नये अशी भूमिका खरगे व अन्य काही नेत्यांनी घेतली. खरगेंच्या या भूमिकेनंतर त्यांच्यात व शरद पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. सुरुवातीला आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील हे शरद पवार यांनीच सुचवले, पण खरगे, पवार चकमकीने बैठकीचा नूर पालटला, असा खुलासा संजय राऊतांनी केला आहे. हे सगळे सुरु असताना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे बराच काळ त्यांच्या मोबाईल फोनवर खाली मान घालून ‘चॅटिंग’करत होते.

त्यानंतर तेही बैठकीतून बाहेर पडले. अजित पवारांचा फोन त्यानंतर ‘स्विच ऑफ’झाला व दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचे दर्शन थेट राजभवनावरील शपथविधी सोहळ्यात झाले, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच महाविकास आघाडी व फडणवीस-अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत केलेले अनेक दावे राऊत यांनी खोडून काढले आहेत. निवडणुकांचे निकाल ते शपथविधी हा ३७ दिवसांचा रोमांचक प्रवास होता. या सर्व दिवसांतील बहुतेक सर्व घडामोडींचा मी साक्षीदार आहे. महाराष्ट्राबरोबर यात दिल्लीच्याही घडामोडी आहेत. सरकार स्थापनेच्या नाट्याची खरी पटकथा अद्याप पडद्यामागेच आहे व राहील, असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

You might also like