सगळं बंद करण्याची मुख्यमंत्र्यांना हौस नाही, शिवसेनेचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्यांना सगळं बंद करण्याची हौस नाही, असा पलटवार करतानाच थोडा संयम ठेवा अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी भीती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. तसेच केंद्र सरकार प्रमाणे कोरोना देवाची करणी आहे, असं मानायला राज्य सरकार तयार नसल्याचा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिर सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. राऊत म्हणाले, राज्यातील जनतेचे आरोग्य आणि जीवित लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला असून सगळं काही बंद रहावं अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा नाही. उलट मंदिर सुरु करण्याची त्यांची मनापासून इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्याच्या मनस्थितीत असल्याचे राऊत यांनी सांगितले.

देशासह राज्यातील कोरोना आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात हजारोंच्यावर लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली पाहिजे. लोकशाहीत सर्वच विरोधकांना मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचा अधिकार आहे. यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज नाही, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

इम्तियाज जलील यांना टोला

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या आंदोलनावर राऊत म्हणाले, आपल्या शहराची काय परिस्थिती आहे हे जर निवडून आलेल्या खासदारांना कळत नसेल तर दुर्दैव आहे. मागच्या वेळी तिरंगी लढतीत ते अपघाताने निवडून आले. आता पुन्हा हा अपघात होणार नाही, असे सांगत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि शिवसैनिक खडकेश्वर मंदिर परिसरात गेल्यानंतर जलील यांना आंदोलन मागे घ्यावे लागले, असा टोला त्यांनी लगावला.