सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावर ‘शिक्कामोर्तब’, तीनही पक्षांकडून ‘कॉमन मिनिमम प्रोग्रॅम’वर हस्ताक्षर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याबाबत काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार स्थापनेसाठीच्या फॉर्म्युल्यावर तिन्ही पक्षांनी शिक्कामोर्तब केलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर हस्ताक्षर केलं आहे. सोबतच एका समन्वय समितीची स्थापनाही करण्यात आली आहे जी सरकारच्या कामकाजावर नजर ठेवेल. असेही म्हटले जात आहे की, काँग्रेसला विधानसभा अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रीपद मिळेल.

असा असेल सत्तावाटपाचा फॉर्म्युला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकासआघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार शिवसेना, राष्ट्रवादीला प्रत्येकी 15 – 15 मंत्रिपदे तर काँग्रेसला 12 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. चार आमदारांमागे एक मंत्रिपद असा हा महाविकासआघाडीचा फॉर्म्युला आहे. त्यानुसार मंत्रिपदांचे वाटप करण्यात येईल. या फॉर्म्युल्या नुसार मिळालेल्या जागांच्या बरोबरीने 4 आमदारांमागे एक मंत्रिपद मिळणार आहे. म्हणजेच मंत्रिमंडळात या फॉर्म्युलानुसार 42 मंत्रिपदे असण्याची शक्यता आहे.

महाविकासआघाडी
सूत्रांनी माहिती दिली आहे की, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या आघाडीला महाविकासआघाडी नाव दिले जाणार आहे. शिवसेनेनं महाशिवआघाडी असं नाव सुचवलं होतं. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष या नावाशी सहमत नव्हते. कोणत्याही पक्षाची इच्छा नव्हती की, आघाडीत एखाद्या पक्षाचं नाव यावं.

शुक्रवारी होणार घोषणा
याआधी अशी बातमी होती की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक झाल्यानंतर शुक्रवारी शिवसेनेसोबत पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल. तीनही पक्षांसोबत बैठक झाल्यानंतरच सरकार स्थापनेबाबत घोषणा केली जाईल. असेही सांगितले जात आहे की, तीनही पक्षांच्या आघाडीतील सरकारची स्थापना झारखंड निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याआधीच केली जाईल.

‘शनिवारी राज्यपालांना भेटणार’ : संजय राऊत
मीडिया रिपोट्सनुसार, संजय राऊतांनी राज्यपालांना भेटण्याबाबत भाष्य केलं आहे. राऊत म्हणाले, “राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना भेटण्यासाठी शनिवारीची वेळ घेतली जाईल. यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते आपल्या आमदारांचं समर्थन पत्र राज्यपालांकडे सुपूर्त करतील. मुख्यमंत्रीपदासाठी अडीच अडीच वर्षांच्या कोणत्याही फॉर्म्युल्यावर अद्याप काहीही बोलणं झालेलं नाही.

Visit : Policenama.com