महाविकास आघाडी पचनी पडली नाही, शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटलांनी सांगितलं

पुणे (शिरुर) : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे पक्ष राज्यातील सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेसोबत आले. तीनही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी तयार करुन सरकार स्थापन केले. मात्र, ही महाविकास आघाडी अद्याप आमच्या पचनी पडलेली नाही, आघाडीचा समन्वय खालच्या पातळीवरील शिवसैनिकांपर्यंत पोहचला नसल्याने कार्यकर्ते याबाबत अनभिज्ञ असल्याचे शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीचा प्रयोग राबविला असला तरी आगामी काळातील स्थानिक पातळीवरील निवडणुकीबाबत याबाबत कुठलेही धोरण ठरले नसल्याचे आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले. आढळराव पाटील म्हणाले, लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आंबेगाव, खेड व जुन्नर जागांवर पराभव पत्कारावा लागल्याने गांभीर्याने आत्मपरीक्षण केले जात आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगाप्रमाणे पुढील निवडणुकांबाबत कोणतेही धोरण ठरले नसल्याने आम्ही स्वतंत्ररित्या निवडणुकीच्या तयारीला आणि पक्ष संघटना मजबुतीचा ठोस कार्यक्रम हाती घेतला आहे. हा कार्यक्रम ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवीत असल्याचे आढळराव यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात एकही आमदार नसल्याने शिवसेनेला मंत्रीपद मिळणार नाही. मंत्रिपद मिळणार नसले तरी मुख्यमंत्री आमचा असल्याने आम्हाला मंत्रीपदाची गरज नाही. मंत्रिपदापेक्षा पक्ष आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रलंबित योजनांना व विकासकामांना चालना दिली जाईल, असे आढळराव पाटील यांनी सांगितले.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या कामाचे मूल्यमापन जनतेनेच करावे. यापूर्वी मी जे मुद्दे संसदेत मांडले तेच मुद्दे घेऊन ते संसदेचा वेळ घेत असल्याचे त्यांनी सांगितले. मी मांडलेल्या विषयांवर केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याची एक वर्षापूर्वीचे पत्रे माझ्याकडे आहेत. तशीच पत्रे त्यांना मिळाली असून मागील आठ ते दहा दिवसांपासून ते सोशल मीडियावर व्हायरल करत आहे. मात्र, त्या पत्रातील मजकूर देखील वाचता येत नाही असा टोला त्यांनी अमोल कोल्हेंना लगावला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/