महापालिका अभियंत्यांवर बूट भिरकावला ; उपनेत्यासमोर शिवसैनिकांचे कृत्य

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – बोल्हेगाव येथील रस्त्याबाबत शहर अभियंता वालझाडे यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिवसैनिकांतील एकाने बूट फेकून मारला. परंतु सदर बूट बाजूला पडला आहे. आज दुपारी महापालिका कार्यालयात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

बोल्हेगाव येथील रस्त्याच्या कामाबाबत तक्रार करण्यासाठी शिवसेना उपनेते अनिल राठोड, शिवसेनेचे नगरसेवक व इतर कार्यकर्ते आज दुपारी शहर अभियंता वालझाडे, अभियंता सोनटक्के यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांच्या दालनात गेल्यानंतर शिवसैनिकांनी घेराव घालून अभियंत्यांकडे विचारणा सुरू केली. शिवसैनिक व अधिकाऱ्यांत शाब्दिक चकमक सुरू असतानाच एकाने पायातील बूट अभियंता वालझाडे यांच्या दिशेने जोरात फेकून मारला. हा बूट हुकून बाजूला पडला. सुदैवाने त्याचा फटका बसला नसला, तरी या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासमोरच आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी हे कृत्य केले. सदर घटनेनंतर शहर अभियंत्यांच्या दालनात मोठी गर्दी झाली आहे.

Loading...
You might also like