युतीवर नाराज शिवसेना आमदाराचा राजीनामा खिशातून बाहेर, काँग्रेसच्या वाटेवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यातच राजकीय पक्षांमध्ये खलबत सुरु आहेत. निवडणुका तोंडावर असताना बंडखोरांचे पक्षांतर सुरु आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधून दिग्गज मंडळी भाजपात प्रवेश करीत असतानाच आता शिवसेनेचे विदर्भातले आमदार बाळू धानोरकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. धानोरकर हे वरोरा-भद्रावतीचे आमदार आहेत. त्यांना काँग्रेसकडून लोकसभेसाठी तिकीट देण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे. धानोरकर यांनी बुधवारी आमदारकीचा आणि शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला.

युतीवर नाराजी

भाजप आणि शिवसेना यांच्या युतीमुळे अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहे. त्यांची मनं वाळवण्याच्या प्रयत्नात सध्या भाजप आणि शिवसेना आहे. एवढेच नाही तर त्यासाठी युतीकडून प्रत्येक मतदार संघासाठी समन्वयक देखील नेमण्यात आले आहेत. युतीचा परिणाम स्थानिक राजकारणात देखील झाला आहे. स्थानिक राजकारणामुळे चंद्रपूरमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या विरोधात अनेक नेते एकत्र आले आहेत. धानोरकरांचे अहीर यांच्यासोबत मतभेद झाले होते. त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडण्याचा विचार केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिवसेनेने भाजपसोबत युती करू नये असं मानणाऱ्यांचा जो गट शिवसेनेत होता त्यात धानोरकर होते. आता युती झाल्यामुळे स्थानिक समिकरणं बदलल्याने त्यांनी काँग्रेसचा हात पकडण्याचा निर्णय घेतला.

चंद्रपूरमधून काँग्रेसचे विलासराव मुत्तेमवार यांच्या मुलाला तिकीट दिलं होतं. मात्र त्यावरून वाद झाल्याने तो निर्णय थांबविण्यात आला. आता त्या जागेवरून धोनोरकरांच्या नावाचा विचार काँग्रेस करत आहे. बुधवारी धानोरकर मुंबईत होते. त्यांनी विविध नेत्यांच्या भेटीही घेतल्या. काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. दरम्यान लोकसभेची निवडणूक लढवायची असल्याने राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेस राष्ट्रवादीकडून प्रस्ताव आला नाही अशी माहितीही त्यांनी दिली. धानोरकर गुरुवारी नवी दिल्लीत जाऊन राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.