साताऱ्यात नरेंद्र पाटीलांची माघार, पण उदयराजेंच्या अडचणीत वाढ

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीनंतर राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांच्या विरोधात पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणाऱ्या नरेंद्र पाटील यांनी माघार घेतली आहे. नरेंद्र पाटील यांनी माघार घेतली असली तरी उदयनराजे भोसले यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. मात्र, उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने हा मतदारसंघ भाजपकडे गेल्याने नाराज शिवसेनेच्या उमेदवाराने उदयनराजे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

उदयनराजे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेसोबत पोटनिवडणूक होत आहे. उदयनराजे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली आहे. उदयनराजे भोसले यांना श्रीनिवास पाटील यांनी आव्हान निर्माण केले असून या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या ठिकाणी शिवसेनेचे नाराज नेते पुरुषोत्तम जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने उदयनराजे यांची डोकेदुखी वाढली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघ हा युतीमध्ये पारंपारिकदृष्ट्या शिवसेनेकडे होता. मात्र, उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेचे नाराज झालेले पुरुषोत्तम यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. जाधव यांनी 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेकडून आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढले होते. एकिकडे राष्ट्रवादीने सर्व शक्ती पणाला लावली असताना पुरुषोत्तम जाधव यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असल्याने उदयनराजे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या नरेंद्र पाटील यांनी पोटनिवडणुकीत माघार घेतली असली तरी जाधव यांच्या उमेदवारीमुळे मतविभाजन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कदाचीत याचा फटका उदयनराजे भोसले यांना बसू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

visit : Policenama.com