एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यामागे शरद पवारांचं राजकीय ‘गणित’ !

पोलीसनामा ऑनलाईनः गेली चार दशके भाजपात कार्यरत राहिलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath-khadse) यांनी बुधवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. खडसे शुक्रवारी (दि. 23) दुपारी राष्ट्रवादीत प्रवेश कऱणार आहेत. खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देत शरद पवार (NCP chief Sharad Pawar) यांनी भाजपाला मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे. दरम्यान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी खडसेंना प्रवेश देण्यामागे शरद पवारांची काही राजकीय गणितं असू शकतात असा अंदाज वर्तवला आहे.

खडसेंची भूमिका मान्य असल्यानेच राष्ट्रवादीने त्यांना प्रवेश दिला असेल असंही ते म्हणाले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते. खडसे यांनी मांडलेली भूमिका मी ऐकली. ती भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल म्हणून त्यांनी प्रवेश दिला. शरद पवार राजकारणातील सर्वात ताकदवान नेते असून त्या पक्षाचे प्रमुख आहेत. ते असं उगाच कोणाला प्रवेश देणार नाहीत. त्यांना त्यांचं महत्त्व पटलं असेल. मी शरद पवारांचं आधीचं वक्तव्य ऐकलं ज्यामध्ये त्यांनी जे सोडून गेले आहेत त्यांना परत प्रवेश देणार नाही सांगितलं. इतका कठोर निर्णय़ जर शरद पवार घेऊ शकतात तर त्याच वेळेला भाजपामधील प्रमुख नेत्याला प्रवेश देत आहेत. यामेगे त्यांची काही राजकीय गणितं असू शकतात असे ते म्हणाले.

भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी छळले होते. माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाला. तो फडणवीसांनी करायला लावला, याचा मनस्ताप झाला. या सर्व मानसिक छळामुळेच पक्षांतराचा निर्णय घेतल्याचे खडसे यांनी म्हटलं आहे. भाजपमध्ये अन्याय होत असल्याची भावना अनेकदा जाहीरपणे मांडणाऱ्या खडसे यांच्या पक्षांतराबाबतच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होत्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही त्यांनी चर्चा केली होती. लवकरच पक्षांतर करण्याचे संकेत खडसे यांनी अलीकडेच दिले होते. अखेर बुधवारी त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवले. खडसे यांचा समावेश लवकरच मंत्रिमंडळात होण्याची शक्यता असून, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मंत्री राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.