शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍याला शिवसैनिकांकडून बेदम चोप (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम – छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणार्‍या एकाला चंद्रपूरकर शिवसैनिकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच त्याच्या तोंडाला काळे फासून गळ्यात चप्पलांचा हार घालून गावात धिंडही काढली. सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी-कोकोवाडा गावात ही घटना घडली.

जितेंद्र राऊत असे त्याचे नाव असून शिवसैनिकांनी त्याच्याविरुद्ध सिंदेवाही येथे रीतसर तक्रार दाखल केली आहे. राउत याने छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी सतत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. त्याने संभाजी महाराजांबद्दल ही अशाच पद्धतीने फेसबुक पोस्ट केल्या होत्या. स्थानिक शिवसैनिक आणि पोलिसांनी यासंदर्भात त्याला पोलीस ठाण्यात बोलावून समजही दिली होती. मात्र, यानंतरही या पोस्ट सुरूच राहिल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्‍हे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी पेंढरी-कोकेवाडा या गावात जाउन त्याची बेदम धुलाई केली. त्याच्याकडून महाराजांविषयी माफी देखील मागून घेण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात गुन्हे नोंदविण्याची कारवाई सुरू असून सिंदेवाही शहरात झालेल्या धिंड काढण्याच्या प्रकाराने मोठा जमाव एकत्र झाला होता.