नाशिक : गावठी बंदुकीनं गोळी झाडून काळवीटाची हत्या, 2 जण ताब्यात

मनमाड : पोलीसनामा ऑनलाईन –   नांदगाव तालुक्यातील जामधरी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावठी बंदुकीनं काळवीटाची शिकार केल्याची घटना घडली आहे. यानंतर पशु-पक्षीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून 2 आरोपींना पकडलं आहे. तसंच त्यांच्याकडून एक गावठी बंदूक, 5 जिवंग काडतूसं, काळवीटाचं मांस आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना 15 दिवसाची वन विभाग कोठडी देण्यात आली आहे अशी माहिती वन विभागाचे निरीक्षक दत्तात्रय बोरसे यांनी दिली आहे.

नेमकं काय घडलं ?

नांदगाव तालुक्यात वन विभागाचे शेकडो हेक्टर जंगल असून त्यात हरिण, काळवीट, ससे, मोर यासह अनेक वन्य जीव आहेत. अनेकदा शिकारी लपून त्यांची शिकार करतात. जामधरी भागात शुक्रवारी रात्री असाच प्रकार घडला. 2 शिकाऱ्यांनी गावठी बंदुकीची गोळी झाडून एका काळवीटाची शिकार करून हत्या केली.

या शिकारीबद्दल माहिती मिळताच वन विभागाचे निरीक्षक दत्तात्रय बोरसे, वनपाल तानाजी भुजबळ, कुणाल वंडगे, एबी राठोड, प्रफुल पाटील, अजय वाघ, बाबासाहेब सुर्यवंशी, नाना राठोड, अशोक सोनवणे, राजेंद्र दौंड, मार्गेपाड आदींनी घटनास्थळी धाव घेत 2 आरोपींना अटक केली.

मुदस्सर अहेमद आणि जाहिद अहेमद (रा मालेगाव) अशी आरोपींची नावं आहेत. या आरोपीकडून एक गावठी बंदूक, 5 जिवंत काडतुसं, काळवीटाचं मांस आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. विविध कलमांअंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टानं त्यांना 15 दिवसांची कोठडी दिली आहे.