धक्कादायक ! पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये सलाइनमध्ये आढळून आले ‘शेवाळ’

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यभरात कोरोनाचा कहर सुरु असतानाच बाधितांवर उपचार करताना हलगर्जीपणा केला जात असल्याचे दिसून आले आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर इथे एका सलाइनच्या सीलबंद बाटलीत शेवाळ आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. एकीकडे कोरोनाची दहशत आणि दुसरीकडे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याने नागरिकांची भीती आणखी वाढली आहे.

मंचरमधील एका खासगी रुग्णलायात हा प्रकार घडला असून निष्काळजीपणा केल्यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सलाइनच्या सीलबंद बाटलीत शेवाळ आढळल्यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर पृश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, संबंधित खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी स्वत:च हा प्रकार उघडकीस आणला आहे. त्यानंतर आणलेल्या सर्व सलाईनच्या बाटल्यांचा वापर तात्काळ थांबवला आहे. दरम्यान, यासंबंधी डॉक्टरांनी पोलिसांकडे जाण्यास नकार दिला आहे.