धक्कादायक ! बँकेतील काचेच्या दरवाजाला धडकल्याने महिलेचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बँकेत कामासाठी गेलेली एक महिला काचेच्या दरवाजाला घाईघाईत धडकून पडली. अगदी एखादी किरकोळ दुखापत झाली असेल असे म्हणून कुणी फार लक्षही दिले नाही. अगदी तिलाही काही कळायच्या आत भराभर रक्त वाहू लागले आणि अनपेक्षितपणे अनेक कर्मचार्‍यांच्या डोळ्यादेखत त्या महिलेने शेवटचा श्वास घेतला. ही घटना केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात पेराम्बवूर इथे एका बँकेत घडली.

सीसीटीव्ही फूटेज आता व्हायरल होत आहे. बीना पॉल या चाळीस वर्षांच्या महिलेने या विचित्र अनपेक्षित घटनेत प्राण गमावले आहेत. काही कागदपत्र आणण्यासाठी ही महिला बँकेतून घाईघाईत बाहेर पडताना सीसीटीव्हीमध्ये दिसते. गडबडीत बँकेचा काचेचा दरवाजा लक्षात न आल्याने ती धडकली आणि खाली पडली. किरकोळ दुखापत झाली असेल, असे वाटून ती तिची उठूनही उभी राहिली.

बँकेत उपस्थित असणार्‍या कर्मचार्‍यांनाही या घटनेने विशेष काही वाटले नाही. पण काही क्षणातच त्या महिलेला खूप काही लागले असल्याची जाणीव झाली असावी. सुरक्षा रक्षक आणि काही कर्माचार्‍यांनी तिला खुर्चीत बसवलं. पण तरीही दुखापत गंभीर असले अशी कुणकुणही कुणाला लागली नाही.तिला तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच तिचे निधन झाले.