धक्कादायक ! ‘प्रहार’चे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांची गोळी झाडून हत्या, राज्यात खळबळ

अकोट : पोलीसनामा ऑनलाइन – शुक्रवारी रात्री अज्ञात मारेकर्‍यांनी अकोट येथील पोलीस वसाहतीत प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पुंडकर यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ही घटना घडल्यानंतर मध्यरात्री पालकमंत्री बच्चू कडू यांनी रूग्णालयात जाऊन पुंडकर यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.

तुषार पुंडकर यांच्या पाठीला दोन गोळ्या लागल्या होत्या. हल्लेखोरांनी देशी कट्ट्याचा वापर केल्याची माहिती मिळत आहे. पोलिस मारेकर्‍यांचा शोध घेत असून अद्याप हल्ल्याचे कारण समजलेले नाही. पुंडकर यांच्यावर हल्ला झाल्यानंतर रात्री 11.30 वाजताच्या सुमारास त्यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेची माहिती सर्वत्र पसरताच एकच खळबळ उडाली होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रात्री तुषार पुंडकर हे पोलीस वसाहतीमधील दूध डेअरीजवळ उभे असताना कोणीतरी त्यांच्या मागावर असल्याचा संशय त्यांना आला. यावेळी जीव वाचवण्यासाठी त्यांनी पोलीस वसाहतीच्या दिशेने धावत सुटले. यावेळी मारेकर्‍यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. पुंडकर यांच्या पाठीत दोन गोळ्या लागल्याने ते खाली कोसळले. येथील लोकांनी त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून मारेकर्‍यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, मारेकरी सापडले नाहीत. शिवसेना आमदार नितीन देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावडे यांनी रूग्णालयात जाऊन पुंडकर यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

दरम्यान, उपचार सुरू असताना आज सकाळी पुंडकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात भितीचे आणि तणावाचे वातावरण असून रुग्णालयाबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.