प्रहार यवतमाळ शहर अध्यक्षाची आत्महत्या

यवतमाळ : पोलिसनामा ऑनलाइन – येथील प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष असलेले तुषार श्रीराम भोयर यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तुषार भोयर यांचा सायबर कॅफे असून, ते सोमवारी दुपारी सायबर कॅफेमधून हनुमान नगर येथील घरी परतले. त्यांची पत्नी हॉलमध्ये बसलेली असताना भोयर यांनी दुपारी ३ च्या सुमारास घरातील किचनमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच पत्नीने आरडाओरडा करत शेजाऱ्यांना मदतीस बोलावले.

तातडीने तुषार यांना वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तुषार भोयर यांच्या आत्महत्येची बातमी कळताच येथील शवविच्छेदन गृहासमोर त्यांच्या नातेवाईकांची आणि मित्रांची गर्दी जमली होती. भोयर यांनी एवढा टोकाचा निर्णय का घेतला हे अद्याप कळू शकले नाही. अवधूतवाडी पोलिस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. भोयर यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, आई-वडील आहेत.