Video : लोकसभेत मुस्लिम खासदार म्हणाला, ‘वंदे मातरम्’ इस्लाम विरोधी ; सभापतींशी भिडला भाजप खासदार

नवी दिल्ली :वृतसंस्था – संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा शपथेवरुन वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर् रेहमान बर्क यांनी शपथ घेतल्यानंतर वंदे मातरम हे इस्लामच्या विरोधात असल्याचे म्हंटले आणि आम्ही त्याचे पालन करू शकत नाही, असे सांगितले. रहमान यांच्या या विधानानंतर भाजपच्या खासदारांनी गोंधळ घालायला सुरवात केली आणि शपथग्रहणाचा कार्यक्रम काही काळ थांबवावा लागला. अधिवेशनाची सुरवात झाल्यानंतरच सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात वंदे मातरम आणि भारत माता की जय अशा घोषणा द्यायला सुरवात केली.

लोकसभेत निवडून गेलेले उत्तरप्रदेशमधील सदस्य शफीकुर् रेहमान बर्क यांना शपथ देण्यात येत होती. त्यांनी उर्दू भाषेत शपथ घेतल्यानंतर भारताचे संविधान झिंदाबाद अशी घोषणा दिली आणि वंदे मातरम इस्लामच्या विरोधात असल्याचे सांगून आम्ही याचे पालन करत नाही असे सांगितले. संसदेत असे बोलताच भाजप खासदारांनी शेम शेम अशा घोषणा दिल्या.

रहमान यांच्या अशा विधानानंतर भाजप खासदारांनी अजून जोरात वंदे मातरम घोषणा देण्यास सुरवात केली. यानंतर उपसभापतींनी सांगितले की फक्त शपथेचीच नोंद घेण्यात येईल इतर काहीही नोंदवले जाणार नाही.

भाजप खासदार सतीश गौतम सभापतींवरच रागावले
यानंतर जेव्हा भाजपचे खासदार सतीश गौतम शपथ घ्यायला आले तेव्हा त्यांनी जय श्रीराम, भारत माता की जय आणि वंदे मातरम अशा घोषणा दिल्या. यावर लोकसभेच्या उपसभापतीने सांगितले की याची कसलीही नोंद घेण्यात येणार नाही. असे बोलताच सतीश गौतम उपसभापतींवर भडकले. त्यांनी म्हंटले की, का रेकॉर्डवर घेतले जाणार नाही ? पहिल्यांदा त्यांना का रोखण्यात आले नाही ? असे प्रश्न त्यांनी तावातावाने विचारले.