अघोरी उपचार करणाऱ्या मांत्रिकाला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   ऊस तोड करत असताना एका मजुराला विषारी साप चावला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी त्याच्यावर अघोरी उपचार करण्याचा धक्कादायक सुरु असताना रांजणगाव पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत मजूराला रुग्णालयात दाखल केले. तर अघोरी उपचार करणाऱ्या मांत्रिकाला अटक केली. मजुराला वेळीच उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले असल्याची माहिती रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली. ही घटना शिरुर तालुक्यातील गणेगाव खालसा येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यात ऊसाचे क्षेत्र जास्त असून सध्या याठिकाणी ऊस तोड सुरु आहे. गणेगाव खालसा येथे ऊस तोडणी सरु असताना एका मजुराला विषारी साप चावला. त्याला उपचारासाठी दवाखान्यात न नेता मांत्रिकाद्वारे अघोरी उपचार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तात्काळ रांजणगाव पोलिसांचे पथक आणि अंधश्रद्धा निर्मुल समितीचे कार्यकर्ते यांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी माहिती घेतली असता ऊस तोड मजुर अंकुश बंडु वाघ (रा. देवघट, ता. मालेगाव) यांना ऊसाच्या फडात विषारी सापाने दंश केला होता. त्याच्यावर कथित मांत्रिक जयवंत श्रीपती शिंदे (रा. गणेगाव खालसा) हा मंत्र-तंत्राद्वारे अघोरी उपचार करताना दिसून आला. यावेळी पोलिसांनी ऊस तोड मजुराची मांत्रिकाच्या ताब्यातून सुटका करुन त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ऊस तोड मजुराला वेळेत उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले आहेत.

याप्रकरणी मांत्रिक जयवंत शिंदे याच्या विरुद्ध पोलीस पाटील विनायक दंडवते यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून मांत्रिकास अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत यांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत, पोलीस नाईक एम.बी. काळकुटे, व्ही.पी.मोरे, व्ही.एन. मोहिते. आर. बी. होळनोर, महिला पोलीस अंमलदार शुभांगी पवार, निर्मला ओव्हाळ यांच्या पथकाने केली.