‘…तर मी आत्महत्या करेन’ : ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह

पोलिसनामा ऑनलाइन –एका कलाकाराचं आपल्या कलेवर जीवापाड प्रेम असतं. ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह अशाच कलाकारांपैकी एक आहे. शाह यांनी सिनेमा आणि नाटक अशा दोन्ही क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक असलेले शाह आजही अभिनयाचा सराव करतात. अलीकडेच त्यांनी आपलं अभिनयावरील प्रेम व्यक्त केलं आहे. सकाळी लवकर उठून जर अभिनयासाठी संधी मिळाली नाही तर मी आत्महत्या करेन असं त्यांनी म्हटलं आहे.

एक वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नसीरूद्दीन शाह म्हणाले, “अभिनय माझा श्वार आहे. ज्या प्रकारे एखादा पैलवान सकाळी उठल्यावर व्य्यायाम करतो, एखादा गायक भल्या पहाटे गाण्याचा रियाज करतो. त्याचप्रमाणे मीही रोज अभिनयाचा सराव करतो. लोक माझ्या अभिनयाची स्तुती करतात माझ्या यशाचं रहस्य हे सरावात लपलं आहे. अनेकदा मला असं वाटतं की सकाळी उठून जर मी अभिनय करू शकलो नाही तर मी आत्महत्या करेन.”

अभिनयात करिअर करू पाहणाऱ्यांना टीप्स देताना नसीरूद्दीन शाह म्हणाले, “नवख्या कलाकारांचा उत्साह पाहून मला आनंद वाटतो. त्यांना मी एकच सल्ला देईन की, दररोज सराव करा. सराव असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रीत तरबेज होऊ शकता. कोणताच कलाकार जन्मानं उत्कृष्ट नसतो. शेवटी तुम्हाला सरावाच्या शिडीचाच वापर करावा लागणार आहे” असंही ते म्हणाले.