राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी संगमावरून माती आणणार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राम मंदिराच्या उभारणीला लवकरच सुरुवात होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार आहे. मंदिराच्या भूमिपूजनाला विशेष माती आणली जाणार आहे. ही माती संगमावरून आणली जाणार असून, माती आणणार्‍या व्यक्तीचे नाव लवकरच जाहीर केले जाणार आहे.

अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या कामाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरूवात होणार आहे. 5 ऑगस्ट रोजी पायाभरणीचा कार्यक्रम होणार असून, यासाठी विशेष तयारी सुरू आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी संगम अर्थात गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम असलेल्या ठिकाणाची माती अयोध्येत आणण्यात येणार आहे. विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवक्ते अश्विनी मिश्रा यांनी याविषयीची माहिती दिली.

राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी संगमावरील माती आणि पवित्र जल वापरायला हवे, असे विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. अशोक सिंघल यांनी म्हटले होते. त्यामुळे ही माती आणणार्‍यांची नावे निश्चित करण्यात येणार असून, लवकरच त्याची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती मिश्रा यांनी दिली.