‘सोमेश्वर’च्या सभासद व कामगारांची दिवाळी गोड करणार : पुरूषोत्तम जगताप

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – गत हंगामातील साखरेचा शिल्लक साठा, व्याजाचा अतिरिक्त बोजा, कोरोनाचे संकट, अतिरिक्त ऊसाचा प्रश्न एवढे संकट कारखान्यासमोर असताना देखील सोमेश्वर सह. साखर कारखाना यंदा ऊस उत्पादक सभासदांची व कामगारांची दिवाळी गोड करणार असल्याची ग्वाही ‘सोमेश्वर’चे चेअरमन पुरूषोत्तम जगताप यांनी दिली.

सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील सोमेश्वर सह. साखर कारखान्याच्या ५९ व्या गाळप हंगामाचा गव्हाण पुजन व गळीत हंगाम शुभारंभ संचालक मंडळाच्या शुभहस्ते पार पडला. त्यावेळी जगताप बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, व्हाईस चेअरमन शैलेंंद्र रासकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक नामदेवराव शिंगटे, विशाल गायकवाड, महेश काकडे, उत्तम धुमाळ, महेश राणे, दिलीप थोपटे, लक्ष्मण गोफणे, दौलतराव साळुंंखे ,लालासाहेब माळशिकारे, सुनिल भगत, किशोर भोसले, ऋतुजा धुमाळ, हिराबाई वायाळ यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जगताप पुढे म्हणाले कि, चालू गळीत हंगामात कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ३१ हजार एकर ऊसक्षेत्र असून जवळपास १३ लाख में.टन ऊसाची उपलब्धता आहे. कारखान्याची दैनंदिन सरासरी ६ हजार मे. टन ऊसाची गाळप क्षमता असून कारखाना १८१ दिवसांत जास्तीत जास्त अकरा लाख मे. टन ऊसाचे गाळप करू शकतो. त्यामुळे एक ते दीड लाख मे. टन अतिरिक्त ऊस इतर कारखान्यांना देऊन त्याचे पेमेंट योग्य पद्धतीने वेळेवर मिळण्याकरिता संचालक मंडळ त्यांच्याशी चर्चा करीत आहे. तसेेेच अतिरिक्त ऊसाचे जे संकट आहे त्यातुन मार्ग काढून सर्व ऊसाचे गाळप करू असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.

चालू हंगामाला सामोरे जात असताना मागील हंगामातील पाच ते सव्वा पाच लाख मे. टन साखर गोडाऊनमध्ये शिल्लक आहे. म्हणून चालू हंगामामध्ये बी – हेवी मोलँसेसवरती इथेनॉल, अल्कोहोलचे उत्पादन करून साखरेचे उत्पादन काही प्रमाणात कमी करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. चालू हंगामात ३१४ ट्रक – ट्रँक्टर, ९३१ बैलगाडी, १२ हार्वेस्टर, १८५ डंपिंग ट्रँक्टरशी कारखान्याने करार केला आहे. या करिता १० लाख रूपयांचा अँडव्हान्स देण्यात आलेला असून अतिरिक्त ऊसाचे व कोरोनाच्या संकटात ऊस तोड मजूर कमी प्रमाणात येऊ नये याची खबरदारी संचालक मंडळाने घेतली असल्याचे जगताप यांनी सांगितले.

चालू हंगाम सुरू करताना परतीच्या पावसाचे व ऊसतोड मजुरांचा सुरू असलेला संपाचे
संकट असून संचालक मंडळ हा हंगाम यशस्वीपणे पार पाडेल असा विश्वास व्यक्त करून गत हंगामातील साखरेचा शिल्लक साठा, व्याजाचा अतिरिक्त बोजा, कोरोनाचे संकट, अतिरिक्त ऊसाचा प्रश्न एवढे संकट व अडचणी कारखान्यासमोर असताना देखील सोमेश्वर कारखान्याने गेल्या हंगामाची २ हजार ७८९ रूपये ही एफ.आर.पी. असताना आत्तापर्यंत २ हजार ९०० रूपये सभासदांच्या खात्यांंवर वर्ग केलेले आहेत. परंतु दिवाळीसण जवळ आल्याने संचालक मंडळ सभासद व कामगारांचीही दिवाळी गोड करणार असल्याची ग्वाही चेअरमन पुरूषोत्तम जगताप यांनी देऊन चालू हंगामाकरिता सभासद, कर्मचा-यांसह सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

अंतिम ऊसदर देण्यास ‘सोमेश्वर’ कमी पडणार नाही – पुरूषोत्तम जगताप
कोरोनाच्या संकटामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यात आल्यामुळे वार्षिक ताळेबंद लवकरच पुर्ण करून संचालक मंडळाची सभा होईल. त्यामध्ये अंतिम दर ठरेल व लवकरच गत हंगामातील अंतिम ऊस दर जाहीर केला जाईल. राज्यामध्ये ‘सोमेश्वर’ कारखाना अंतिम दरामध्ये कोठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही ‘सोमेश्वर’चे चेअरमन पुरूषोत्तम जगताप यांनी दिली.