बापाचा मुलासाठी जिव तुटला, पण दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने बापावरच हात उगारला

अकोले :  पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे मद्य विक्रीची दुकाने बंद होती. दीड महिना दारू विक्री बंद होती. अखेरीस राज्य सरकारने घरपोच डिलिव्हरीच्या अटीवर दारू विक्री सुरु केली. मात्र, दुसरीकडे दारू विक्री सुरु केल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दारूच्या नशेत गुन्हे होऊ लागले आहेत. दारूच्या नशेत एका मुलाने आपल्या जन्मदात्या बापालाच संपवल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे घडली असल्याचे वृत्त एका मराठी वृत्तपत्राने दिले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बोरी येथील ही घटना आहे. 65 वर्षीय वृद्ध वडिलांनी आपल्या मुलाला दारूमध्ये पैसे खर्च करू नको, पैसे जपून वापर असा सल्ला दिला. त्यामुळे चिडलेल्या मुलाने दारूच्या नशेत बापालाच लाथा बुक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. भागवत गोमा कांबळे असे मृत्यू झालेल्या वृद्ध वडीलांचे नाव आहे.

बोरी येथील कांबळे वस्तीत राहणारे भागवत कांबळे यांनी लॉकडाऊनमुळे आपल्या एकुलत्या एक मुलगा राजेंद्र याने पैसे दारूवर खर्च करून नयेत म्हणून त्याची समजूत काढली. मात्र, दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने बापावर हात उगारला. राजेंद्र हा दारूच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याच्याकडून सुटका व्हावी म्हणून त्याची पत्नी काही दिवसांपासून माहेरी गेली होती. सोमवारी (दि.18) घरात रजेंद्र आणि त्याच्या वडीलांमध्ये वाद झाला. दारुच्या नशेत असलेल्या मुलाने बापाला बेदम मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मयत भागवत कांबळे यांच्या मुलीनं पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी राजेंद्र विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.