गेल्या दहा वर्षांपासून अनेक राजकीय पक्षांकडून ऑफर्स आल्या, सोनू सूद राजकारणात प्रवेश करणार ? जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – देशात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून अभिनेता सोनू सूद अहोरात्र मजुरांना मदत करत आहे. आतापर्यंत हजारोंच्या संख्येने त्याने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवलं आहे. सोनुने स्वखर्चातून बस, विमान, रेल्वे या माध्यमातून मजुरांना त्यांच्या गावी पाठवलं आहे. त्यामुळे स्थलांतरित मजुरांसाठी सोनू सूद देवदूत बनला आहे. सोनू सूदने केलेल्या मदतकार्याची सोशल मीडियावरती जोरदार चर्चा होत आहे. सर्वच स्तरातून त्याचं कौतुक केलं जात आहे. त्यामुळे भविष्यात तो राजकारणात येणार की काय अशी सुद्धा चर्चा होत आहे. मात्र, एका वृत्तवाहिनीला बोलताना सोनु सूदने यावरती उत्तर दिलं आहे.

सोनू म्हणाला, “मी राजकारणात असतो तर कदाचित जे काही करत आहे, ते मोकळेपणाने करू शकलो नसतो. मी सध्या जे करतोय त्यात खुश आहे. माझ्या अभिनयाच्या करियरमध्ये मी खुश आहे. मला गेल्या दहा वर्षांपासून अनेक राजकीय पक्षांकडून ऑफर्स आल्या. पण मला राजकारणात जाण्यात रस नाही.” राजकारणात असतो तर मदतकार्य इतक्या मोकळेपणाने करू शकलो नसतो, असं म्हणत त्याने भविष्यात राजकारणात जाण्याच्या चर्चांवर पूर्णविराम दिला आहे.

तसेच खऱ्या आयुष्यात हिरो ठरलेल्या सोनू सूदने शेवटचा स्थलांतरित त्याच्या घरी पोहचेपर्यंत मदतकार्य सुरु ठेवणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.