मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोटोसह झळकलं – ‘संजय भाऊ, ‘I am Sorry’चं फलक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचा निकाल लागून 13 दिवस उलटले असताना देखील अद्याप सरकार स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. शिवसेना नेते संजय राऊत यांनी निकालानंतर अनेकवेळा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचा दावा केला आहे. त्यातच आता पिंपळे सौदागर येथील शिवार चौकामध्ये एक फलक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असून या फलकाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. शिवार चौकामध्ये ‘संजय भाऊ I AM SORRY’ चे फलक झळकत आहेत.

काही महिन्यापूर्वी पिंपरीतील पिंपळे सौदागर येथे प्रेम प्रकरणातून ‘shivade i am sorry’ असे फलक लागले होते. ही बॅनरबाजी शहरात चर्चेचा विषय ठरली होती. या प्रकरणात पुण्यातील प्रियकरावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून 72 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. यानंतर आता शिवार चौकामध्ये ‘संजय भाऊ I AM SORRY’ फलक लागल्याने ‘SORRY’ म्हणण्याची वेगळी पद्धत निघाल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरु आहे.
Shivsena
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. सत्ता स्थापनेमध्ये शिवसेना किंग मेकर ठरल्याने शिवसेनेने याचा फायदा घेत मुख्यमंत्री पदावर दावा केला. तर मुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाच्या खात्यांवर भाजपने दावा करत शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिला आहे. त्यातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेची एक बाजू लावून धरली आहे. आज पिंपळे सौदागर येथे लागलेल्या फलकावर मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून त्यावर ‘संजय भाऊ I AM SORRY’ असे लिहण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे.

हे फलक कोणी लावले हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, ज्याने कोणी हे फलक लावले आहेत. त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. अशा फलकांमुळे असंतोष पसरवला जात असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. अशा प्रकारचे फलक लावून राजकीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Visit : Policenama.com