अंतराळमध्ये चीन-रशियाकडून युद्ध ?, जपानच्या उपग्रहाजवळ दिसला सॅटेलाइट ‘किलर’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   संपूर्ण जग करोना विषाणूशी लढत आहे. त्यामुळे इतरांनी केवळ कोरानाची लस संशोधन आणि लोकांचे जीव कसे वाचविले जातील, याकडे लक्ष दिले जात आहे. मात्र, चीन देशाच्या कुरापती सुरू आहेत. आक्रमक विस्तारवादी धोरणांमुळे शेजारील देशांसोबत चीनचे संबंध तणावपूर्ण झालेत. त्यातच आता चीन आणि रशिया एकत्रितपणे अंतराळात युद्ध सुरू करण्याच्या तयारीत आहेत, असा आरोप करण्यात येत आहे. जपानच्या एका उपग्रहाजवळ चीन आणि रशियाचे किलर सॅटेलाइट आढळले आहेत. त्यामुळे जपानच्या अधिकाऱ्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

याबाबत जपानच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, चीन आणि रशियाचे सॅटेलाइट्स जपानच्या लष्करी सॅटेलाइटच्या जवळ आले आहेत. त्याबाबत जपानने अमेरिकेला याची माहिती दिली आहे. चीन आणि रशिया या देशाच्या सॅटेलाइट्च्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जपानकडे यंत्रणा नाही. त्यामुळे त्यांनी अमेरिकेची मदत घेण्याचे ठरविले आहे. या सॅटेलाइट्सच्या मदतीने जपान गुप्त माहिती मिळवते.

जपानमधील वृत्तपत्र योमीरीने म्हटले की, या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकन टोही सॅटेलाइटजवळ रशियाचे कॉस्मोस २५४२ हे उपग्रह पोहचले होते. त्यानंतर अमेरिकेने धोक्याचा इशारा जारी केला होता. रशियन किलर सॅटेलाइट अमेरिकन उपग्रहाच्या खूपच जवळ होता. रशियन उपग्रह अमेरिकन उपग्रहाच्या फोटोग्राफीक डिटेल्सही घेऊ शकत होता.

रशियन उपग्रह अंतराळांमध्ये शत्रू देशाच्या उपग्रहाला निष्क्रिय अथवा नष्ट करण्याचा सराव अभ्यास करत आहे, असे अमेरिकेने म्हटले होते. अमेरिकेत जगातील सर्वाधिक गुप्तहेर उपग्रह आहेत. या उपग्रहांच्या मदतीने अमेरिका इतर देशातील गुप्त माहिती आणि हालचालींवर लक्ष ठेवत आहे. यापैकी काही उपग्रहांना रशिया अथवा चीनने नष्ट केल्यास युद्धजन्य परिस्थितीत अमेरिकेचे मोठे नुकसान होऊ शकते.

चीनकडेही अंतराळात मारा करण्याची क्षमता अधिक आहे. जमिनीतून हवेत डागता येणारे अॅण्टी सॅटेलाइट मिसाइल आणि लेझर गन चीनने विकसित केले आहे. वेळप्रसंगी चीन अमेरिकेच्या उपग्रहांना लक्ष्य करू शकते, अशी तयारी देखील केली आहे.

भारताकडेदेखील अॅण्टी सॅटेलाइट मिसाइल आहेत. मार्च २०१९ मध्ये भारताने याची चाचणी घेत एका निष्क्रिय उपग्रहाचा वेध घेतला होता. चीनच्या कुरापती जमीनीवरच नव्हे तर आता अंतराळातही पहायला मिळत आहेत. चीन आणि रशिया हे दोन्ही देश मिळून जपानच्या उपग्रहाशी काय करणार? आणि जपान त्यांच्या हालचाली कशा शमविणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.