सरकारविरुद्ध बोलणे म्हणजे ‘महाराष्ट्र द्रोह’ नव्हे आणि शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नव्हे : देवेंद्र फडणवीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  आम्ही शिवसेनेच्या नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून भाजपला ‘महाराष्ट्रद्रोही’ म्हणत आहेत. मात्र, सरकारविरुद्ध बोलणे म्हणजे ‘महाराष्ट्र द्रोह’ नव्हे आणि शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नव्हे, असा सणसणीत टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. बुधवारी देवेंद्र फडणवीस शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला.

पुणे पदवीधर मतदारसंघात बोगस मतदारांची नोंदणी झाली, असा आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचाही देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला. भाजपने बोगस नोंदणी केल्याचे वक्तव्य करून जयंत पाटील यांनी पराभव मान्य केला. ईव्हीएम मशीनवर आरोप करता येत नाही म्हणून ‘कव्हर फायरिंग’ केले जात आहे. हा आरोप म्हणजे पुणेकर मतदारांवर अविश्वास दाखवण्याचा प्रकार आहे, असेही फडणवीस म्हणाले.

जनतेसह शिक्षक, पदवीधरांत सरकारबाबत असंतोष

वीजबिलांबद्दल सरकारने घूमजाव केला. या सरकारची एक वर्षात एकही उपलब्धी नाही. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले, अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना मदत अद्यापही मिळाली नाही. पंचनामेही अर्धवट आहेत. कोरोनादरम्यान विरोधकांना विश्वासात घेण्यात आले नाही. बैठकांना बोलवण्यात आले नाही. विरोधकांनी केलेल्या सूचनेवर कारवाई करण्यात येत नाही. सरकारबाबत जनतेसह पदवीधर व शिक्षकांमध्ये असंतोष असून हा असंतोष संघटित झालेल्या पदवीधरांच्या निवडणुकीत दिसेल, असे त्यांनी म्हटलं.

त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ

कोरोना काळात विरोधक राजकारण करत असल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. त्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, तक्रार करण्यासाठी का होईना आमच्या आंदोलनाची दखल घेतली हे काही कमी नाही. तद्वत, सरकार पडेल याकडे आम्ही डोळे लावून बसलेलो नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. हे अनैसर्गिक सरकार असून, ज्या दिवशी हे सरकार पडेल, त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

संजय राऊत यांना चिमटा

संजय राऊत यांनी १२० लोकांची यादी द्यावीच. आम्ही त्या यादीची वाट पाहू, असे आव्हानही फडणवीस यांनी दिले. प्रताप सरनाईक वार्ताहरांना बोलतात, सामना कार्यालयात जातात, मात्र ईडीसमोर जात नाहीत. ईडीच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापासून ते इतरत्र पळत आहेत, असेही ते म्हणाले. दरम्यान, यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेवक गणेश बिडकर उपस्थित होते.

You might also like