पुरंदर तालुक्यात सरपंचांवरील अविश्वास ठराव विशेष ग्रामसभेने धुडकावला !

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील जनतेतून थेट निवडून आलेले सरपंच महादेव बोरावके यांच्यावर १० ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता व तो मंजूरही झाला होता. यानुसार महादेव बोरावके हे जनतेतून निवडून आलेले असल्याने विशेष ग्रामसभेत अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान होणे गरजेचे होते.यासाठी शुक्रवार दिनांक ६ रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या विशेष ग्रामसभेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते.या ग्रामसभने अविश्वास ठराव २९५ इतक्या मतांनी धुडकावून लावला.

महादेव बोरावके हे जनतेतून निवडून आल्याने त्यांना ग्रामसभेत त्यांच्या बाजूने मतदान होणे आवश्यक होते. या नुसार आज शुक्रवार दि.०६ रोजी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार ग्रामसभेतून या प्रस्तावावर मतदान घेण्यातआले. आज सकाळ पासूनच मतदारांनी मतदानासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी दिवसभरात वेगवेगळ्या तीन बुथ मधुन मतदान घेण्यात आले. यावेळी बूथ १ – मध्ये ११७२ मतदार पैकी ६२३ मतदारांनी मतदान केले. बूथ – २ मध्ये -११७० मतदार पैकी ६३७ मतदारांनी मतदान केले. बूथ ३ – मध्ये ८०० मतदार पैकी ४६३ मतदारांनी मतदान केले. एकूण ३१४२ मतदारांपैकी १७२३ मतदारांनी मतदान केले. यामध्ये २५४ मते अवैध ठरली ठरावाच्या बाजूने ५८७ मते पडली तर विरोधात ८८२ मते पडली त्यामुळे २९५ मतांनी हा अविश्वास ठराव फेटाळला गेला आहे. याबाबतची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तसेच गटविकास अधिकारी अमर माने यांनी जाहीर केला आहे.