चविष्ट अन् पौष्टिक, करायला सोपे खजूराचे लाडू !

पोलीसनामा ऑनलाइन – श्रावण महिना सुरु होताच सणासुदीचे दिवस देखील सुरु होतात. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. त्यातच येणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. लाडक्या गणरायला वाजतगजात घरी आणले जाते. बप्पाचे आदरातिथ्य करण्यासाठी जय्यत तयारी देखील केली जाते. त्याचबरोबर बाप्पाच्या नैवद्याची तयारी सुरु असते. नैवेद्य दाखवण्यासाठी आणि प्रसाद म्हणून वाटण्यासाठी अनेक गोडाचे पदार्थ तयार कले जातात. अनेकवेळा वेळेअभावी हे पदार्थ बाजारातून आणले जातात. पण तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हटके पदार्थ नैवेद्य आणि प्रसादासाठी तयार करु शकता.

सण-उत्सव साजरे करत असताना आपल्याला आपले आरोग्य देखील जपायचे असते. यासाठी तुम्हाला हटके रेसिपी सांगणार आहोत. गणरायाच्या नैवद्यासाठीच नाही तर कोणत्याही सणाला देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी हा पदार्थ झटपट तयार करु शकता. नैवेद्यासाठी हेल्दी आणि टेस्टी खजुराच्या लाडूची रेसिपी आज तुम्हाला सांगणार आहोत.

जाऊन घ्या कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने खजुराचे लाडू कसे तयार करायचे…
साहित्य –
– एक कप खजूर
– सुका मेवा (बारिक कापलेले काजू, बदाम, पिस्ता, मनुके)
– तीन चमचे मावा
– एक कप साखर
– एक कप दूध
– अर्धा चमचा वेलची पावडर
– दोन मोठे चमचे ओल्या नारळाचं खोबरं

कृती
– सर्व प्रथम खजुराच्या बिया काढून ते लहान तुकड्यांमध्ये कापून घ्या. त्यानंतर हे तुकडे अर्धा कप दुधामध्ये भिजवून मिक्सरमधून बारिक करून त्याची पेस्ट तयार करा.
– आता गॅसवर मध्यम आचेवर एक पॅन ठेवून त्यामध्ये तुप गरम करुन घ्या.
– तूप गरम झाल्यावर त्यामध्ये पिस्ता, खजूर आणि साखर टाकून जवळपास 5 मिनिटांपर्यंत परतून घ्या. तुम्ही साखरेऐवजी गुळही वापरू शकता.
– मिश्रण चांगलं परतल्यावर त्यामध्ये मावा आणि दूध टाकून शिजवून घ्या.
– त्यानंतर यामध्ये वेलची पावडर आणि बारिक केलेला सुका मेवा टाकून एकत्र करा आणि गॅस बंद करा.
– मिश्रण हाताला चिटकू नये यासाठी तळव्यावर थोडं तूप लावून घ्या.
– मिश्रण थोडं थंड झाल्यावर हाताने गोल लाडू वळून घ्या.
– खोबऱ्यामध्ये लाडू घोळवून घ्या.
– तयार आहेत नैवेद्याचे चविष्ट आणि पौष्टिक खजूराचे लाडू.