रियाच्या इशार्‍यावर घरी येत होते ड्रग्ज, सुशांतचा स्टाफ दीपेशचा कबुलीनामा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुशांत सिंह राजपूत केससाठी आज मोठा दिवस आहे. शनिवारी सायंकाळी सुशांतचा स्टाफ दीपेश सावंतला एनसीबीने अटक केली होती आणि रात्रभर दीपेशवर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार दीपेशने रियाच्या विरोधात कबुली दिली आहे. दीपेशनुसार, रियाच्या इशार्‍यावर घरी ड्रग्ज मागवले जात होते. दीपेशच्या या महत्वाच्या कबुलीनंतर आज एनसीबीची टीम कोणत्याही वेळी रियाच्या घरी पोहचू शकते. रियाला तपासात सहभागी होण्यास सांगितले जाऊ शकते.

चौकशीत एनसीबीला सॅम्युअल मिरांडाने सुद्धा रियाच्या ड्रग्ज कनेक्शनवर काही माहिती दिली आहे. सोबतच शौविकने सुद्धा रियाची रहस्य उघड केली आहेत. महिला अधिकारी सहभागी असलेली एनसीबीची टीम आज रियाच्या घरी कधीही पोहचू शकते. यासाठी एनसीबीची टीम लोकल पोलिसांची सुद्धा मदत घेईल. एनसीबी रियाकडे ड्रग्ज प्रकरणात कठोर चौकशी करणार आहे. रियाचे मिरांडा, शौविक आणि अन्य लोकांसोबत झालेल्या व्हॉट्सॲप चॅटबाबत एनसीबी चौकशी करेल. यासोबतच अंदाज वर्तवला जात आहे की, रिया चक्रवर्तीला या प्रकरणात अटकसुद्धा होऊ शकते.

रियाच्या भावाला अटक झाल्यानंतर रियाला अटक होण्याची शक्यता आणखी दाट झाली आहे. कारण जवळपास सर्वांनी रियाचे नाव आपल्या जबाबात घेतले आहे. एनसीबीने शुक्रवार आणि शनिवारी अनेक मोठी पावले उचलली आणि ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीसह काही ड्रग्ज पॅडलर्सच्या घरावर छापा मारला. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ने रियाचा भाऊ शौविकसह 7 अन्य लोकांना अटक सुद्धा केली आहे. यामध्ये सॅम्युअल, करण, कैजान, दीपेश आणि जैद यांचा समावेश आहे. दीपेशचे जबाब एनडीपीएस कायद्याच्या कलम 67 च्या अंतर्गत नोंदवण्यात आला होता आणि त्यास एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक केली आहे. आज हे प्रकरण कोणते वळण घेते हे पाहण्यासारखे असेल.