नीरा – बारामती एस.टी. बसच्या चालक-वाहकाच्या अरेरावीने प्रवाशी संतप्त

नीरा : पोलीसनामा ऑनलाईन – नीरा-बारामती मार्गावर धावणाऱ्या एस.टी.बसचे चालक – वाहक गलथान कारभार करून उलट प्रवाशांनाच अरेरावी करीत अपमानास्पद वागणूक देत आहे. यामुळे नीरा – बारामती मार्गावरून प्रवास करणाऱ्या वृद्ध महिला, विद्यार्थीनींसह प्रवासी संतप्त झाले आहेत. राज्य परिवहन महामंडळाने संबंधित चालक – वाहकाची चौकशी करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.

नीरा (ता.पुंंरदर) येथून बारामतीला जाणाऱ्या प्रवाशांची तसेच शालेय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या मार्गावरून धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसच्या चालक – वाहकांचा वाईट अनुभव वृद्ध महिला, विद्यार्थीनींसह प्रवाशांना अनेक वेळा आला आहे. मात्र शनिवारी (दि. १७) काही प्रवाशांना असाच अनुभव आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त करीत चालक – वाहकांनी कहरच केला असल्याचा आरोप केला आहे.

त्याचे कारण असे की, शनिवारी (दि. १७) नीरा (ता. पुरंदर) येथील बसस्थानकात सकाळी पाऊणे दहा वाजता सुटणारी नीरा-बारामती ही बारामती आगाराची एस. टी. बस नं. एम. एच. ०७ सी ७१०७ उभी होती. या बसचे वाहक कोकरे बसमध्ये बसले होते. त्यावेळी काही प्रवाशी बसमध्ये बसण्यासाठी बसजवळ येत असताना क्षणार्धातच त्या बसचा चालक दगडे आपल्या सिटवर बसले व वाहकाने बेल दिली नसतानाही एस.टी.च्या नियमांचा भंग करून चालक नीरा बसस्थानकातून प्रवाशांच्या गर्दीतून बस अतिवेगाने जोरात दामटू लागला. तेवढ्यात काही प्रवाशांनी बसचा दार जोरात वाजविल्याने चालकाने बस थांबविली.

त्यावेळी वाहकाने दरवाजा उघडला व बारामतीस निघालेल्या प्रवाशांची त्या बसच्या चालक-वाहकाने
मानहाणी करीत अरेरावीची भाषा वापरून दुस-या मागील बसमध्ये या ? कळत नाही कां तुला ? असे म्हणत बसमधील प्रवाशांसमोर को-हाळे बु। गावांपर्यंत अपमानास्पद वागणूक दिली. वास्तविक बसमध्ये चढणाऱ्या काही प्रवाशांमध्ये वृद्ध महिला व सुशिक्षित तरुणांचा समावेश होता. चालक दगडे व वाहक कोकरे यांच्या विरोधात प्रवाशांच्या अनेक तक्रारी एस.टी. प्रशासनाकडे असल्याचे समजते.

वास्तविक बसस्थानकातून बस नेत असताना चालकाने बसस्थानकात उभ्या असलेल्या प्रवाशांचा विचार करून बसस्थानकातून जात असताना बसचा वेग कमी असणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना पहावयास मिळत नाही. नीरा-बारामती मार्गावरील चालक – वाहकांकडून जेष्ठ नागरिक, वृद्ध महिला, शाळा काॅलेजच्या विद्यार्थ्यींना नेहमीच अपमानास्पद वागणूक मिळत असते. याकडे महामंडळाचे दुर्लक्ष झाले आहे.

दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाने शनिवारी (दि.१७) नीरा येथून सकाळी सुटणा-या बारामती आगाराची एस. टी. बस नं. एम. एच. ०७ सी ७१०७ च्या चालक दगडे – वाहक कोकरेे कामात कूचराई करीत असून त्यांची वरीष्ठ पातळीवरून चौकशी करावी, तसेच या मार्गावरील चालक – वाहकांना समज द्यावी अशी मागणी संतप्त प्रवाशांनी विभागीय नियंत्रकांकडे केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like