‘दौंड-पुणे’ विद्युत लोकल सुरू करा, आ. कुल यांची पियुष गोयलांकडे मागणी, रेल्वे मंत्र्यांनी दिलं आश्वासन

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन टीम (अब्बास शेख) – दौंड-पुणे विद्युत लोकल लवकर सुरु करण्याची मागणी आमदार राहुल कुल यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांचेकडे केली असून आमदार कुल यांच्या मागणीची गंभीर दखल घेऊन विद्युत लवकरच सुरू करण्यात येईल असे आश्वासन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आ.कुल यांना दिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांची आमदार राहुल कुल यांनी दि. ११ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे भेट घेतली व दौंड तालुक्यातील रेल्वेच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन दिले. रेल्वेची सेवा विस्तारण्याच्या व प्रवाश्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या दौंड-पुणे लोहमार्ग विद्युतीकरणाचे काम पूर्ण होऊन २ वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला असून, अद्याप या मार्गावर विद्युत लोकल सुरु झालेली नाही, दौंड-पुणे विद्युत लोकल सुरु व्हावी हि या मार्गावर दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो विद्यार्थी, कामगार व व्यावसायिकांची मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून मागणी आहे, संपूर्ण विद्युतीकरण झालेल्या या मार्गावर डिझेल वर चालणारी डेमू लोकल चालवली जाते या गाडीच्या अनियमित वेळा तसेच प्रवासाला होणाऱ्या उशिरामुळे महिला भगिनी, विदयार्थी, शेतकरी तसेच कामानिमित्त दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची अतिशय गैरसोय होते आहे.

तेव्हा दौंड-पुणे मार्गावर तातडीने विद्युत लोकल चालू करण्यात यावी, पुणे- दौंड मार्गावर दिवसेंदिवस प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता या मार्गावर धावणाऱ्या लोकलच्या १२ फेऱ्या करण्यात याव्यात अशी मागणी आमदार कुल यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे देखील आमदार कुल यांचे समवेत उपस्थित होते. याबाबत रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.