पहिल्यांदाच 2 संकटाचा एकाचवेळी सामना, 41 पथक तैनात, ‘अम्फान’बद्दल NDRF च्या डीजींनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एनडीआरफ (नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स) चे संचालक एसएन प्रधान यांनी अम्फानच्या वादळाच्या तयारीची सविस्तर माहिती देताना सांगितले की, एनडीआरएफची 41 पथके पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये तैनात करण्यात आली आहेत. बऱ्याच दशकांनतर असे एक सुपर चक्रीवादळ येत आहे ज्यासाठी आम्हाला पूर्णपणे तयार राहावे लागणार आहे. एनीआरफचे संचालक प्रधान यांनी सांगितले की, ओडिशामध्ये 15 पथके आणि पश्चिम बंगालमध्ये 19 पथकांना जमीनीवर तैनात करण्यात आले आहे. सात पथके स्टँडबाईवर ठेवण्यात आले आहेत जे आवश्यक असल्यास विमानाने आणले जाऊ शकतात. द्या अम्फान लँडफॉल करेल.

हे चक्रीवादळ रौद्ररुप धारण करण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तयारी सुरु आहे. त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही प्रथमच एकत्रितपणे दोन आपत्तींचा सामना करत आहोत. कोवीड 19 च्या काळात आपल्यासमोर चक्रीवादळाचे दुहेरी आव्हान आहे. आम्ही या आव्हानाचा सामना करण्यासाठी परिणामानुसार पावलं उचलणार आहोत. पुढील 24 तासात अम्फान अतिशय भीषण चक्रीवादळ बनू शकतं, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

या वादळामुळे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच समुद्रात उंच लाटा निर्माण होण्याचा अंदाज आहे. बंगालच्या खाडीच्या दक्षिणेत असलेलं हे वादळ हळूहळू वायव्य दिशेला सरकत आहे. येत्या काही तासात याचं रुपांतर भीषण चक्रीवादळात होण्याचा अंदाज आहे. बांगलादेश आणि पश्चिम बंगालमधील दीघा आणि हटिया इथे 20 मे रोजी दुपारी किंवा संध्याकाळी हे वादळ धडकण्याची शक्यता आहे.