शिकल्या सवरलेल्या आणि कमाई करणार्‍या महिला पतीकडून पोटगीच्या नाहीत हक्कदार : न्यायालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पतीपेक्षा कमी पैसे कमावण्याचा हवाला देत पोटगीची मागणी करणाऱ्या महिलेची याचिका कोर्टाने फेटाळली. सत्र न्यायालयाने म्हटले की, महिला शिक्षित आहे आणि ती नोकरी करते. नवऱ्यापेक्षा कमी पगार असण्याच्या आधारे बायको पोटगी मागू शकत नाही. याप्रकरणी मेट्रोपॉलिटन दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेला आदेश सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे. रोहिणी येथील जे.के. मिश्रा यांच्या न्यायालयात महिलेकडून विनवणी केली गेली होती की, तिचे २०१८ मध्ये लग्न झाले. कुटुंबीयांनी सासरच्या लोकांना बराच हुंडा दिला होता, पण नवरा आणि सासरच्यांनी कमी हुंडा मिळाल्याने तिला त्रास देणे सुरू केले. यामुळे तिला स्वतंत्रपणे राहणे भाग पडले. ती सध्या भाड्याने राहत आहे. नवऱ्याकडून असे सांगण्यात आले आहे की, लग्नाच्या १७ दिवसांपासूनच पत्नी विभक्त आहे. घर सोडताना ती दागिने व मौल्यवान वस्तू घेऊन गेली होती.

प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर प्रकरण उघडकीस आले
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने दोन्ही पक्षांना उत्पन्नाबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. आयकरची प्रतही मागितली. दोन्ही पक्षांनी सादर केलेल्या अहवालानुसार, पतीचे मासिक उत्पन्न ४५ हजार रुपये असल्याचे आढळून आले, तर पत्नीचे मासिक उत्पन्न ३६ हजार रुपये असल्याचे दिसून आले.

पत्नीकडून हा युक्तिवाद केला गेला
मात्र पत्नीचे म्हणणे होते की, १० हजार रुपये घराच्या भाड्यासाठीच जातात आणि उर्वरित २६ हजार रुपयात खर्च भागवणे कठीण होत आहे. कोर्टाने सांगितले की, पत्नीने कमावणे आवश्यक आहे. जर ती शिक्षित असेल आणि स्वत:चा खर्च भागवू शकत असेल तर ती कुणावरही अवलंबून नाही. अशा प्रकरणात, निम्न न्यायालयाने महिलेची मागणी फेटाळण्याचा निर्णय न्यायसंगत आहे. त्यावर पुन्हा सुनावणीची गरज नाही.