कवी आणि कवितेलाही घाबरले शी जिनपिंग ? राजीनामा मागितल्यावर टाकलं तुरुंगात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉम्ब, बंदूक व तोफांच्या बळावर गर्व असलेल्या चीनची अवस्था अशी आहे की जर कोणी इथे सरकारविरूद्ध दोन शब्द बोलले किंवा लिहिले तर सत्ता अस्वस्थ होते. आवाज उठवणाऱ्या लोकांना अशी शिक्षा दिली जाते की इतर लोक आवाज उठवण्यास घाबरतील. अलीकडेच चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांना कवितेद्वारे राजीनामा मागणाऱ्या कवी झांग गुइकी यांच्या बाबतीतही असेच घडले आहे. लु यांग नावाने प्रसिद्ध कवी झांग यांना ‘सर्वोच्च सामर्थ्याविरुध्द लोकांना भडकवण्याच्या’ आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. झांग यांचा दोष होता की, गेल्या महिन्यात त्यांनी जिनपिंग यांना राजीनामा मागण्यासाठी एक कविता ऑनलाइन पोस्ट केली होती. कम्युनिस्ट पक्षाचे सरकार निरंकुश असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

विबोवर अपलोड केलेल्या व्हिडिओमुळेच आपल्या नवऱ्याला अटक करण्यात आली असल्याचे झांग यांच्या पत्नीने सांगितले. व्हिडिओमध्ये झांग हे जिनपिंग यांनी राजीनामा द्यावा आणि निरंकुश कम्युनिस्ट सरकार सत्तेवरून काढून टाकावे, याबाबत बोलले होते. झांग यांना १३ मे रोजी ताब्यात घेण्यात आले होते आणि अधिकृतपणे १९ जून रोजी त्यांच्यावर आरोप लावले गेले आहेत. चीनमधील नागरी हक्कांसाठी काम करणारे वकील शु झियोंग यांनाही सोमवारी २२ जून रोजी अटक झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात लिहिलेल्या निबंधात त्यांनी शी यांच्या नेतृत्वावर टीका केली होती.

झांग यांच्या व्हिडिओविषयी चीनचे स्वतंत्र पत्रकार यांग जिली यांनी व्हॉईस ऑफ अमेरिकाला सांगितले की, त्यांना असा कोणताही संदेश देण्यापूर्वी त्याचा परिणाम माहित असेल आणि शिक्षेसाठी तयार असतील. यांग म्हणाले की, व्हिडिओ एखाद्या बौद्धिक माणसाची मानसिकता दर्शवतो. रेडिओ तैवान इंटरनॅशनलच्या म्हणण्यानुसार, झांग यांचा जन्म १९७१ मध्ये शांडोंग येथे झाला होता आणि बरीच वर्ष लिओशेंग फॉरेन लँग्वेज स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. ते इंडिपेन्डन्ट चायनीज सेंटरचे (आयसीपीसी) सदस्यही आहेत. कवींना त्वरित सोडण्यात यावे अशी मागणी संस्थेने केली आहे.