भारतामध्ये ‘कोरोना’मुळं मृत्यू होणार्‍या 90 % लोकांचं वय 40 पेक्षा जास्त, 69 % पुरूष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर जगातील इतर देशांच्या तुलनेत कमी आहे, पण आत्तापर्यंत भारतातील 65 हजारपेक्षा अधिक लोकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारी नुसार मृतांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. एकूण मृतांमध्ये 69% पुरुषांचा समावेश आहे. वयाचा विचार केला तर कोरोनामुळे मरणाऱ्या 90% लोकांचं वय 40 वर्षांपेक्षा अधिक होतं.

22 ऑगस्ट पर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 56,292 लोकांपैकी अर्ध्यापेक्षा अधिक लोकांचं वय 50 ते 70 वर्षांच्या मध्ये होतं. यामध्ये 561 ते 70 वयाचे लोक अधिक होते, त्यात महिला आणि पुरुष दोघांचा समावेश आहे. कोरोना संक्रमणाशी महिला पुरुषांच्या तुलनेत चांगला सामना करत आहेत. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या प्रत्येक तीन व्यक्तींमागे महिलांचे प्रमाण एकपेक्षा कमी आहे. 22 ऑगस्ट पर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 56,292 लोकांपैकी 17,315 महिला आहेत. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत 38,973 पुरुषांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 4 तृतीयपंथीयांचा समावेश आहे. कोविड-19 पुरुष आणि वयस्कर लोकांसाठी अधिक घातक ठरत आहे. 20 वर्षे वयापर्यंतच्या मृतांपैकी मुले आणि मुलींची संख्या सारखीच आहे, 11 ते 20 वर्षे वयापर्यंतच्या मृतांमध्ये 49% मुलींचा समावेश आहे. मृतांपैकी सर्वात कमी संख्या 10 वर्षाखालील बालकांची आहे. 90 पेक्षा अधिक वय असणाऱ्या 301 जणांचा मृत्यू झाला.

केंदीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन म्हणाले, ‘कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या लोकांमध्ये डायबिटीज, हायपरटेन्शन, किडनी संबंधी आजार असे आजार असणाऱ्या लोकांचा समावेश अधिक आहे. भारताची स्ट्रॅटेजी अधिक चाचण्या वाढवून कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्याची आहे. सोबतच कोविड योद्ध्यांच्या परिश्रमामुळे मृत्यू दर 1.7% इतका कमी झाला आहे.’ जागतिक मृत्यू दर 3.3% इतका आहे.

इन्स्टिट्युट ऑफ लिव्हर अँड बिलियरी साइन्सेज नवी दिल्लीचे डायरेक्टर डॉ. शिव के सरीन म्हणाले, “कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांपैकी तरुणांचा मृत्यू 24 तासाच्या आत झाला, तर वयस्कर व्यक्तीचा मृत्यू न्यूमोनियाचे लक्षण दिसून झाला. पण तरुणांचा मृत्यू अचानक झाल्याचं दिसून आलं. 20 ते 30 वयाच्या रुग्णांची प्रकृती अचानक खालावते आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं दिसून आलं. मेंदू, हृदय आणि फुप्फुसांमध्ये रक्त गोठल्याने त्यांचा मृत्यू होतो.”