दिल्ली हिंसाचार : ‘या’ 5 हत्यारांनी केल्या गेल्या हत्या, पोलिसांच्या रिपोर्टमधून ‘खुलासा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर-पूर्व दिल्लीतील हिंसाचारात पोलिसांनी आतापर्यंत २५४ एफआयआर नोंदल्या आहेत, तर ९०३ लोकांना अटक केली आहे. शस्त्र कायद्यांतर्गत जवळपास ४१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुमारे एका आठवड्यानंतर दिल्लीतील हिंसाचारजन्य परिस्थिती शांत झाली आहे परंतु तणावपूर्ण वातावरण अजून आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान या हिंसाचारात उपद्रवींनी प्रामुख्याने पाच शस्त्रांचा वापर केला होता असे पोलिसांनी तयार केलेल्या अहवालात उघड झाले आहे.

पेट्रोल बॉम्ब आणि अ‍ॅसिड

दुकाने आणि वाहनांना आग लावण्यासाठी उपद्रव माजवणाऱ्यांनी कोल्ड्रिंकच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल भरून बॉम्ब तयार केला आणि त्याचा वापर केला. तसेच उपद्रव्यांनी प्लास्टिकच्या पाउचमध्ये देखील अ‍ॅसिड भरून फेकले.

पिस्तूल चा वापर करण्यात आला

आतापर्यंतच्या तपासात ८७ जणांवर गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. हिंसाचारात उपद्रव माजवणाऱ्यांनी खुलेआम पोलिसांवर आणि लोकांवर गोळीबार केला होता, ज्यामुळे अनेक लोक ठार झाले आणि मोठ्या संख्येने लोक जखमी झाले.

गलोलने केले मोठे नुकसान

दंगलीच्या दरम्यान उपद्रव्यांनी छोट्या आणि मोठ्या दोन्ही प्रकारच्या गलोलचा वापर केला. मोठी गलोल रिक्षाच्या लोखंडाच्या अँगल पासून बनवण्यात आली होती, ज्याने दूरपर्यंत मारा करण्यात येत होता. त्यांना छतावरही लावण्यात आले होते. काही ठिकाणी दंगा करणाऱ्यांनी छोट्या गलोलचा देखील वापर केला.

चाकू आणि तलवार

पोस्ट मॉर्टेम अहवालामध्ये खुलासा करण्यात आला की, आयबी कर्मचारी अंकित शर्मा यांच्या शरीरावर चाकूने ४० पेक्षा जास्त वेळा हल्ला करण्यात आला होता. याशिवाय इतर अनेक जखमींवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या खुणा आढळल्या आहेत.

विट-दगड आणि रॉड

उपद्रव माजवणाऱ्या लोकांनी पोलिस व लोकांवर विट आणि दगडाने हल्ला केला. यासाठी आधीपासूनच विटा आणि दगडांनी भरलेले पोते बर्‍याच भागात ठेवण्यात आले होते. याव्यतिरिक्त, रॉड्स देखील वापरण्यात आले होते.