पाकिस्तानला धक्का ! कर्जाची परतफेड करूनही सौदी अरेबिया देत नाही कच्च तेल, मदतीसाठी पुन्हा पसरवले हात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानला सौदी अरेबियाकडून उधारीचे कच्चे तेल मे पासून प्राप्त झाले नाही, त्यांना पुरवठादाराकडून ही सुविधा सुरू ठेवण्याबाबत अद्याप कोणतेही उत्तर मिळाले नाही. अहवालानुसार, दोन्ही पक्षांमधील 3.2 अब्ज डॉलर्सच्या कराराची मुदत दोन महिन्यांपूर्वीच कालबाह्य झाली आहे. पाकिस्तानने सौदी अरेबियाला या प्रणालीचा विस्तार करण्याचे आवाहन केले आहे, परंतु अद्याप त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही. वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, सौदी अरेबियाने नोव्हेंबर 2018 मध्ये पाकिस्तानच्या बाह्य समस्यांना दूर करण्यासाठी 6.2 अब्ज डॉलर्सचे पॅकेज जाहीर केले होते. सौदी अरेबियाकडून 3.2 अब्ज डॉलर्सची कच्च्या तेलाची सुविधा ही या पॅकेजचाच एक भाग आहे.

पेट्रोलियम विभागाचे प्रवक्ते साजिद काझी यांनी सांगितले की हा करार मे महिन्यात संपला आहे. त्याचे नूतनीकरण करण्यासाठी वित्त विभाग प्रयत्न करीत आहे. ते म्हणाले की, पाकिस्तान सौदी अरेबिया सरकारच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहे. अर्थसंकल्पाच्या अंदाजानुसार सरकारला आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये किमान एक अब्ज डॉलर्स कच्चे तेल मिळणे अपेक्षित आहे. जुलै महिन्यात पाकिस्तानचे आर्थिक वर्ष सुरू होते.

या अहवालात असे म्हटले आहे की पाकिस्तानने सौदी अरेबियाचे एक अब्ज डॉलर्सचे कर्ज वेळेच्या चार महिन्यांपूर्वी परत केले आहे. सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की जर पाकिस्तानला चीनकडून अशीच सुविधा मिळत राहिल्यास ते दोन अब्ज डॉलर्सचे रोकड कर्ज देखील परतफेड करण्याच्या स्थितीत असतील. तसेच वर्षाला 3.2 अब्ज डॉलर्स कच्च्या तेलाच्या सुविधांमध्ये दोन वर्षांच्या नूतनीकरणाची तरतूद आहे.