पतंजलीनं ‘कोरोना’चं औषध बनवल्याचा दावा केल्याचं प्रकरण पोहचलं कोर्टात, बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांच्याविरूध्द खटला दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – योगगुरू बाबा रामदेव यांनी कोरोना विषाणूचे औषध बनवण्याच्या दाव्याचे प्रकरण आता कोर्टात पोहोचले आहे. बिहारच्या मुझफ्फरपूर येथील न्यायालयात बुधवारी बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधात औषधाच्या नावाखाली देशाची फसवणूक केल्याचा आरोप करत खटला दाखल करण्यात आला आहे. मुजफ्फरपूरचे मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात, सामाजिक कार्यकर्ते आणि भिखानपुरा येथील रहिवासी, तमन्ना हाशमीने पतंजली विद्यापीठ व संशोधन संस्थेचे संयोजक स्वामी रामदेव आणि पतंजली संस्थेचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

त्यांनी आरोप केला आहे कि, या दोघांनी कोरोना विषाणूचे औषध बनविल्याचा दावा करून देशाची फसवणूक केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी कोरोना विषाणूपासून मुक्त होण्यासाठी औषध ‘कोरोनिल टॅबलेट’ शोधून काढल्याचा दावा केला आहे. आयुष मंत्रालयाने त्यावर प्रश्न उपस्थित करत , या औषधाच्या प्रसिद्धीवर प्रतिबंध केला आहे.

तसेच तक्रारीत म्हटले आहे की, असे करणे हे षडयंत्रांतर्गत केवळ आयुष मंत्रालयाचीच फसवणूकच नाही तर देशाचीही फसवणूक आहे. यामुळे कोट्यवधी लोकांचे भविष्य धोक्यात आले आहे. तक्रारीत बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांच्याविरुध्द भादंवि कलम 420, 120बी, 270, 504/34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तमन्ना हाशमी म्हणाले की, कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी 30 जूनची तारीख निश्चित केली आहे.