पोलीस उपनिरीक्षक माणिक पवार यांची कर्तव्याला दिली सुवर्ण झळाळी

पुणे –‘सद् रक्षणाय, खल निग्रहणाय’, हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीद ज्यांनी श्वासासारखं जपलं आणि कर्तव्य बजावत असताना आपल्या कामगिरीचा आलेख सातत्याने उंचावत नेला, असे व्यक्तिमत्व म्हणजे सहायक पोलीस फौजदार माणिक बाळासाहेब पवार होय. ग्रामीण भागातून येऊनही आपल्या मेहनत, हिकमत, हिंमत आणि चाणाक्षपणाच्या बळावर सहायक पोलीस फौजदार माणिक पवार यांनी समाजात आदराचे स्थान , गुन्हेगारांच्या मनात दहशत, सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रेम, तर तरुणांच्या मनात आदर्श निर्माण केली. म्हणूनच त्यांच्या आयुष्याची वाटचाल प्रेरणादायी म्हणावी लागेल.

पोलीस खात्यात नोकरी म्हणजे वेगळीच शान मानली जात आहे. गुंडांवर वचक आणि सामान्यांना न्याय देण्यासाठी खाकी अंगावर आहे, हा शिरस्ता पोलीस अधिकारी-कर्मचारी प्राणपणाने जपतात. म्हणूनच पोलीस सेवेत भरती होण्याचे स्वप्न खेड्या-पाड्यातील तरुण पहात असतात. असेच स्वप्न चाळीस पन्नास वर्षांपूर्वी एका तरुणाने पाहिले. शालेय जीवनापासून अभ्यास आणि शरीर कमावून पोलीसात भरती व्हायचे, अशी खूणगाठ त्याने मनाशी बांधली आणि हे स्वप्न साकार केले. हा तरूण म्हणजे आजचे सहायक पोलीस फौजदार माणिक बाळासाहेब पवार (मु.पो. वाल्हे, ता. पुरंदर, जि. पुणे) आज पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये कार्यरत आहेत.

दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरीसाठी मुंबई गाठली. भायखळा येथील मार्केटमध्ये 1984 ते 87 दरम्यान दिवाणजी म्हणून नोकरी केली. खासगी ठिकाणी नोकरी करीत असतानाच पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई म्हणून भरती झाले. कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणा ही त्रिसूत्री वडिलांची शिकवण अंगी बाणवली आहे. दरम्यान, 1987 साली पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई म्हणून भरती झालो. मुंबई मुख्यालयामध्ये 1993पर्यंत नोकरी केली. त्यानंतर 1993 साली पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये बदली झाली. त्यानंतर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना 2007 साली पोलीस नाईक म्हणून बढती मिळाली. पुढे पुणे शहरातील क्राईम ब्रॅन्चमध्ये 2012 बदली झाली. त्यानंतर हवालदार या पदावर बढती मिळाली. त्यानंतर 2018 साली हडपसर पोलीस स्टेशनमध्ये हवालदार म्हणून कार्यरत झालो, 2019 साली सहायक पोलीस फौजदार म्हणून बढती मिळाली, तर 2020 साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आहे.

आतापर्यंत पोलीस दलामध्ये काम करत असताना 268 बक्षिसे मिळाली. 2018 साली पोलीस महासंचालक यांच्याकडून रोख अडीच हजार रुपये आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. 2020 साली पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. ही कामगिरी करीत असताना अनेक अडथळे आले तरी त्यावर मात करून विशेष कामगिरी केली, त्याचे फलित आहे.

दरम्यान, युनिट-5 मध्ये कार्यरत असताना पोलीस कोठडीतून पळून गेलेल्या आणि साडेतीन वर्षे फरार असलेल्या गुन्हेगाराला पकडण्यात यशस्वी ठरलो. क्राईम ब्रॅन्चमध्ये काम करत होतो. त्यावेळी मुक-बधिर मुलीवर बलात्कार करून नऊ वर्षे फरारी असणाऱ्यास जेरबंद करण्यात यशस्वी ठरले. दरम्यानच्या काळात इराणी टोळीला जेरबंद करण्यात यश मिळाले, ही मोठी कामगिरी ठरली. कोरेगाव पार्कमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जबरी चोरी करणाऱ्यास 72 तासांत अटक करून गुन्हा उघड करण्यात यश मिळाले, ही बाब नक्कीच पोलीस खात्याची शान वाढविणारी आहे.