12 CCTV कॅमेरे अन् 10719 बुलेट मोटारसायकलींची तपासणी, सुदीक्षाच्या मृत्यूचं ‘सत्य’ आलं समोर

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – सुदीक्षा भाटी हीच्या मृत्यूचे सत्य सातव्या दिवशी समोर आले आहे. सिकंदराबाद ते औरंगाबाद या मार्गावर असलेल्या कॅमेऱ्याचे फुटेज पोलिसांनी तपासले असता यामध्ये सुमारे 10719 नोंदणीकृत बुलेट मोटारसायकलींची माहिती गोळा केली गेली. याशिवाय 1000 हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली. तेव्हा कुठे मृत्यूचे सत्य समोर आले. हे प्रकरण सोडविण्यासाठी पोलिसांना कठोर परिश्रम करावे लागले.

सुदीक्षा भाटी हीच्या मृत्यूचे सत्य उघडण्यासाठी एसआयटीची स्थापना केली गेली होती. एसआयटीने सिकंदराबाद टोल प्लाझा ते औरंगाबाद घटनास्थळापर्यंत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची माहिती गोळा केली. संपूर्ण मार्गावरील 12 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आढळले. जेव्हा या कॅमेऱ्यांचे फुटेज पुन्हा तपासले गेले तेव्हा घटनेचे रहस्य उघड होत गेले. प्रत्येक कॅमेऱ्यात बुलेट मोटरसायकल पुढे तर त्याच्या मागे सुदिक्षाची बाईक दिसली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलेट मोटारसायकल चालवणाऱ्या दोन आरोपींवर छेडछाड व स्टंट दाखविल्याचा आरोप आहे. त्यामध्ये बुलेट चालवणाऱ्या आरोपी दीपकने हेल्मेट घातले होते, तर मागे बसलेला दुसरा आरोपी राजू यांचे वय साधारण 55 आहे. राजू यांच्या हातात एक बॅग होती. फुटेजच्या तपासणीत कुठेही स्टंट दाखविल्याची पुष्टी नाही.

पोलिसांचे म्हणणे आहे की, अटक करण्यात आलेला आरोपी दीपक सोलंकी एका कंत्राटदाराकडे काम करतो. 10 ऑगस्ट रोजी दीपक चौधरी हे त्यांच्या परिचित राजमिस्त्री राजू यांना घेऊन काळ्या रंगाच्या बुलेटवर बांधकाम साइटवर जात होते. औरंगाबाद चारौरा मुस्तफाबादला अचानक त्यांच्या बुलेटसमोर हिरवा रंगाचा ऑटो आणि म्हशीचा बग्गी आली. यामुळे त्यांना अचानक ब्रेक लावावा लागला. मागून येत असलेल्या सुदीक्षा भाटीची दुचाकी बुलेटला धडकली. यामुळे विद्यार्थी रस्त्यावर पडली आणि तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण इतके वाढले की, दीपक सोलंकी देखील घाबरले होते. कोणालाही काहीही कळू नये म्हणून त्यांनी दुचाकी मॉडीफाय करुन घेतली होती. जातीसूचक लिहिलेली नंबर प्लेट देखील त्यांनी बदलली आणि एक साधी नंबर प्लेट बसवली. एवढेच नव्हे तर टायर व सायलेन्सर्सही बदलण्यात आले. ज्यामुळे गाडीची ओळख पटू नये. परंतु पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचलेच.