Supreme Court | भांडणानंतर आत्महत्या ! 306 आयपीसी गुन्हा नाही – सुप्रीम कोर्टाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – Supreme Court | भांडण झाल्यानंतर आत्महत्या केली म्हणजे याचा अर्थ भांडण करणाऱ्याने आत्महत्येस प्रवृत्त केले होते व तो ३०६ आयपीसीप्रमाणे अपराधी ठरतो असं नाही. असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला आहे.
पती-पत्नीचे (Husband-Wife)भांडण झाले होते. त्यानंतर दोघांनीही विष प्राशन करून आत्महत्या केली. परंतु त्यामध्ये पती बचावला. त्यानंतर पत्नीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पतीविरुद्ध ३०६ आयपीसी (आत्महत्येस प्रवृत्त केले)चा गुन्हा दाखल करण्यात आला.त्यानंतर पतीला न्यायालयाने दोषी ठरवत ७ वर्षे सक्तमजुरी आणि २५०० रु. दंडाची शिक्षा दिली. मद्रास उच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली. या शिक्षेविरुद्ध पतीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
सुनावणीदरम्यान २५ वर्षांपूर्वी दोघांचे लग्न झाले होते. ज्या दिवशी आत्महत्या केली त्यादिवशी भांडणाव्यतिरिक्त आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कोणताही पुरावा पतीविरुद्ध नाही. यावेळी पतीनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात ११३ अ. भारतीय पुरावा कायद्याप्रमाणे पतीविरुद्ध त्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गृहीत धरता येणार नाही, असे मत व्यक्त करत न्यायालयाने शिक्षा रद्द केली. कलम ११३ अ भारतीय पुरावा कायद्याप्रमाणे लग्नानंतर ७ वर्षाच्या आत विवाहितेने आत्महत्या केली असेल तर तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले होते. हे गृहित धरण्यात येते असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
आरोपीची या आत्महत्येच्या घटनेमध्ये सकारात्मक भूमिका असली पाहिजे
कलम ३०६ प्रमाणे गुन्हा सिद्ध होण्यासाठी आत्महत्येच्या घटनेमध्ये आरोपीची सकारात्मक भूमिका असली पाहिजे. म्हणजे आत्महत्येपूर्वी त्याने चिथावणी दिली पाहिजे किंवा आत्महत्या करण्यास मदत होईल, अशी भूमिका बजावली पाहिजे. त्यामुळे आत्महत्येत सकारात्मक भूमिकेशिवाय निकटच्या काळात केवळ त्रास दिला म्हणून आत्महत्या केली म्हणजे ३०६ आयपीसीचा गुन्हा होत नाही. आत्महत्येशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती आरोपीने तयार केली तर त्याने प्रवृत्त केले असे अनुमान काढता येईल.