आदित्य ठाकरेंच्या विरोधात राष्ट्रवादीच्या चिन्हावर ‘हा’ नेता लढणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनसेने अद्याप याठिकाणी उमेदवार दिला नाही. आदित्य ठाकरे यांची विधानसभेवर सहज निवड व्हावी म्हणून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेली शिष्टाई निष्फळ ठरली आहे. बसपा नेते सुरेश माने वरळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. माजी उपमुख्यमंत्री तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत माने यांना एबी फॉर्म देण्यात आला.

आदित्य ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे घराण्यातील पहिला व्यक्ती प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून त्यांची निवडणूक सोपी व्हावी यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादीचे माजी आमदार सचिन आहिर यांना शिवसेनेत घेतले. त्यानंतरही निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेने प्रयत्न केले होते. त्यासाठी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भेटही घेतली होती. राष्ट्रवादीने वरळीतून उमेदवार देऊ नये अशी गळ राऊत त्यांनी पवारांना घातल्याची चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस वरळीची जागा लढवणार असून तिथून बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टीचे नेते अ‍ॅड. सुरेश माने यांना उमेदवारी दिली आहे.

अ‍ॅड. सुरेश माने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असून त्यांना आज पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. वरळीत दलित मतांची संख्याही मोठी आहे. काँग्रेस व मित्र पक्षांच्या साथीनं आदित्य ठाकरे यांना कडवी लढत देता येईल, अशी आशा राष्ट्रवादीला आहे. सुप्रिया सुळे यांनी राजकारणात प्रवेश केला त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी सुप्रिया सुळे विरुद्ध उमेदवार देणार नसल्याचे शरद पवार यांना सांगितले होते. त्यामुळे आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.

Visit : Policenama.com