SSR Death Case : आत्महत्येस प्रवृत्त केल्याची FIR होती, पण आता खून केल्याचं वाटतंय, सुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात दररोज नवीन ट्विस्ट येत आहे. आता सुशांतच्या कुटूंबाचे वकील विकास सिंह यांनी दावा केला आहे की, सुशांतची हत्या झाल्याचा कुटुंबाचा विश्वास आहे. विकास सिंह यांनी हे खुनाचे प्रकरण असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांनी मुंबई पोलिसांच्या वृत्ती व तपासावरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

सुशांतची हत्या केली गेली- विकास सिंह

विकास सिंह यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना असा दावा केला की, मुंबई पोलिसांनी त्यांना किंवा कुटूंबियांना कधीही कोणत्याही प्रकारचे स्टेटमेंट दिले नव्हते. त्यांच्या मते पोलिसांसमोर अगोदरच सर्व माहिती शेअर केली असती, तर हे प्रकरण वेगळ्या दिशेने पुढे गेले असते. त्याचबरोबर स्टेटमेंटच्या भाषेबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबई पोलिसांनी जाहीर केलेले स्टेटमेंट मराठी भाषेत होते, त्यावर विकास सिंह यांनी आक्षेप नोंदवला आहे. तसेच कुटूंबाला ही भाषा समजत नव्हती, पण पोलिसांनी तेच स्टेटमेंट सीलबंद कव्हरमध्ये सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केले.

सुशांतच्या वडिलांनी सांगितली होती हत्या

वकिलाच्या म्हणण्यानुसार, आधी सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केले असे वाटत होते. पाटण्यातील एफआयआरमध्येही या प्रकरणाचा उल्लेख होता. पण आता हे प्रकरण केवळ प्रवृत्त करण्याचे नाही, असा कुटुंबाचा विश्वास आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुशांतची हत्या करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे काही काळापूर्वी सुशांतच्या वडिलांनीही एका निवेदनात म्हटले होते- माझ्या मुलाला विष देऊन मारण्यात आले आहे. सर्व दोषींना शिक्षा झाली पाहिजे. तोपर्यंत विकास सिंह यांनी वडिलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता पहिल्यांदाच विकास यांनीही सुशांतचा खून झाल्याचे म्हटले आहे. अशात या प्रकरणाची समीकरणे पुन्हा बदलली आहेत.

अहवालानुसार, सीबीआयला आतापर्यंत तपासात खुनाचा पुरावा मिळालेला नाही. सीबीआय अद्याप त्या बाबीचा तपास करत आहे, पण अद्याप कशाचीही पुष्टी झालेली नाही. सध्या ड्रग अँगलवर अधिक भर दिला जात आहे.