प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ वक्तव्याला सुशीलकुमार शिंदेंचे ‘हे’ उत्तर

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे. त्यामुळे निवडणुकीवेळी ते असा गाढवपणा करणारच, हे मला माहिती होते. या वक्तव्यावर माजी केंद्रीय गृहमंत्री तसेच सोलापूरचे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीने बोलले तशी आमची संस्कृती नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ११ एप्रिल रोजी देशातील पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात एका हॉटेल मध्ये भेट झाली होती. त्यानंतर, या भेटीमध्ये उभयतांमध्ये घडलेली राजकीय चर्चा व फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांनी ‘काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे. त्यामुळे निवडणुकीवेळी ते असा गाढवपणा करणारच, हे मला माहिती होते. निवडणुकीत भेटी-गाठी होतात. पण त्याचे राजकारण करणे काँग्रेसलाच जमते. अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली होती.

त्यानंतर, प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याला प्रतिक्रिया देतांना त्या दिवशी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील सोलापूर दौऱ्यावर आले होते. ते ज्या हॉटेलमध्ये उतरले होते तेथे त्यांना भेटण्यासाठी गेल्यावर लिफ्टमध्ये नगरसेवक आनंद चंदनशीवे यांची भेट झाली. त्यावेळी चंदनशीवे यांना इकडे कुठे असे विचारल्यावर त्यांनी आंबेडकर येथेच असून ब्रेकफास्ट घेत आहेत अशी माहिती पुरविली. त्यामुळे मी तिथे गेलो. त्यावेळेस तेथे फक्त त्यांचेच कार्यकर्ते होते त्यांनी फोटो काढले. ते फोटो आम्ही व्हायरल केलेले नाहीत. आंबेडकर ज्या पद्धतीने बोलले तशी आमची संस्कृती नाही. आम्ही गाढव किंवा दुसरा शब्द वापरणार नाही, त्यामुळे लोकांनी समजून घ्यावे असे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हंटले.