सिंहगड भागात गळफास घेतलेला मृतदेह आढळला; खुनाची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मध्यवस्तीत राहत्या घरात महिलेचा खून करून मृतदेह आढळून आल्याची घटना उघड झाली असताना सिंहगड रोड भागात महिलेचा राहत्या घरात गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला आहे. महिलेचा खून झाला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान शहरात काही मिनिटांच्या अंतरावर दोन महिलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

राणी चौले (वय 32) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी तिच्या पतीसोबत धायरी परिसरात राहत होती. तिचा पती खासगी कंपनीत नोकरी करतो. तर, महिला गृहिणी आहे. दरम्यान पती रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास घरी आला असता त्याला पत्नीने गळफास घेतल्याचे समोर आले. तात्काळ ही माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी मृतदेह खाली काढून शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन झाले नसल्याचे सांगितले जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांकडून पूर्ण माहिती घेतली जात असून, चौकशी करण्यात येत आहे.