ईशान्य मुंबई तिढा कायम, मनोज कोटक यांना सज्ज राहण्याचे संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली आहे. असे असले तरी शिवसेना-भाजप युतीच्या ईशान्य मुंबईच्या जागेचा तिढा अद्यपाही सुटल्याचे दिसत नसून आजही ही तिढा कायम असल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरीट सोमय्यांऐवजी मनोज कोटक यांचं नाव शर्यतीत सर्वात पुढे आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईची उमेदवारी कोटक यांना मिळण्याची शक्यता असल्याचे समजत आहे. दरम्यान शिवसैनिकांच्या नाराजीचा फटका किरीट सोमय्या यांना बसण्याची शक्यता असल्याचं दिसत आहे.

ईशान्य मुबंईतून किरीट सोमय्या की मनोज कोटक याचा निर्णय संसदीय केंद्रीय समिती करणार आहे. असे असले तरी पक्षाने मात्र मनोज कोटक यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु पक्षाकडून मात्र लोकसभेसाठी मनोज कोटक यांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही.

दरम्यान मनोज कोटक हे निवडणुकीच्या कामाला लागल्याचे संकेत मिळत आहेत. मनोज कोटक यांच्या कार्यालयात भाजप नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची ये-जा सुरु झाली आहे. कालपासून मनोज कोटक ईशान्य मुंबईतील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मुख्य म्हणजे भाजपने किरीट सोमय्यांऐवजी मनोज कोटकांना तिकीट दिलं तर शिवसैनिक त्यांच्या पाठिशीच उभा असेल, असं शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं होतं. इतकेच नाही तर, मनोज कोटक यांच्या व्यतिरिक्त ईशान्य मुंबईतून भाजपकडून पराग शाह, प्रकाश मेहता आणि प्रविण छेडा यांची नावं चर्चेत आहेत असेही समजत आहे.