राजू शेट्टींचा एल्गार ! बारामतीत दूध दरासाठी करणार आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   माजी खासदार राजू शेट्टी येत्या 27 ऑगस्ट रोजी बारामतीत दूध उत्पादकांसमवेत प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. महाविकास आघाडीसोबत सूत जुळल्यानंतरही ते मोर्चा काढत आहेत. राज्यातील एकूण संकलीत दूध उत्पादनापैकी निम्मे दूध पुणे जिल्ह्यातच संकलित होत असल्यानं दुधाचं आंदोलन सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे असा राजकीय अंदाज बांधला जात आहे.

– राज्यातील दूध उत्पादकांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या पोरांचं सरकार आल्यानंतरही 25 रुपये प्रितलिटर दुधाचा दर हा 17 ते 18 रुपयांवर घसरला आहे. – दूध उत्पादकांना उत्पादन खर्चापेक्षाही निम्मा दर मिळत आहे. 30 ते 35 रुपये प्रतिलिटर उत्पादन खर्च असलेल्या दुधाचा दर वाढवून द्यावा अशा मागण्या घेऊन स्वाभिमानीनं दूध दर आंदोलन सुरू केलं आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या 27 ऑगस्ट रोजी बारामतीमधील प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. या मोर्चा शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन देखील राजू शेट्टी यांनी केलं आहे. आता या आंदोलनातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कशा प्रकारे राजकीय उभारी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.