अयोद्धेत 200 फूट खोदकाम करूनही खडक लागला नाही; स्वामी गोविंददेव गिरी महाराज

पोलीसनामा ऑनलाइन – अयोद्धेत साकारण्यात येणा-या राम मंदिराकडे ( Ayodhya Ram Temple ) संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. येथे भव्यदिव्य मंदिर उभारले जाणार असून, त्यासाठी साडेतीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. सध्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी 200 फूट खोद काम करूनही खडक लागलेला नाही. त्यामुळे आधुनिक तंज्ञज्ञानाचा वापर करून तिथे काम केले जात असल्याची माहिती राममंदिर न्यासाचे कोशाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govinddev Giri Maharaj) यांनी दिली.

येथील राम मंदिर निर्माणासाठी शिवसेनेकडून एक किलो चांदीची वीट विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Shiv Sena leader Neelam Gorhe) यांनी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्याकडे सुपूर्त केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, अयोध्येत श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर साकारण्यात येत आहे. मंदिरासाठी अनेकांनी आजवर पुढे येऊन काम केले आहे. त्यात सर्वांत पुढे येऊन वेळोवेळी भूमिका मांडणारे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीसाठी केलेले कार्य कायम सर्वांच्या स्मरणात राहील. त्यांच्या पक्षाकडून दिलेल्या चांदीच्या विटेचा आपण स्वीकार करत असल्याचे ते म्हणाले.