दिल्लीत स्वाइन फ्लूच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ, 14 दिवसात आढळले 109 रूग्ण, ‘अलर्ट’ जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील दोन आठवड्यात दिल्लीत स्वाइन फ्लूच्या रूग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये 14 दिवसात 109 रूग्ण सापडले आहेत. गुरूवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या अहवालानुसार, दिल्लीत 1 जानेवारीपासून 16 फेब्रुवारीपर्यंत स्वाइन फ्लूचे 152 रूग्ण सापडले आहेत. यामध्ये 2 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान 109 रूग्णांचा समावेश आहे. रिपोर्टनुसार, या प्रकरणात दिल्ली देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे, तर तामिळनाडुत स्वाइन फ्लूचे सर्वात जास्त 174 रूग्ण सापडले आहेत.

दिल्ली आरोग्य विभागानुसार, स्वाइन फ्लूबाबत रूग्णालयांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व रूग्णालयांना योग्य औषधे ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागील दोन महिन्यापासून दिल्लीत चीनवरून आलेल्यांची तपासणी सुरू आहे.

अनेक रूग्ण असे आहेत, ज्यांना कोरोना व्हायरसच्या संशयाने भरती करण्यात आले. परंतु, तपासणीत स्वाइन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर एच1एन1 वार्डात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

रिपोर्टनुसार, देशभरात 16 फेब्रुवारीपर्यंत 884 रूग्णांना दवाखान्यांमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापैकी 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त 7 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.