पुणे : मावळ तालुक्यात 27 वर्षीय महिलेचा ‘कोरोना’मुळे मृत्यू, रुग्णसंख्या 35

पुणे/मावळ : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाने ग्रामीण भागात देखील शिरकाव केल्याने प्रशासनासमोरील चिंता अधिक वाढली आहे. माळवमधील धामणे येथील एका 27 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मावळमधील रुग्णांची संख्या 35 झाली असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे. तळेगाव नगरपरिषदेच्या हद्दीत सध्या 25 पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आहेत.

तहसीलदारांनी मावळमधील कोरोना बाबत माहिती देताना सांगितले की, रविवारी तळेगाव येथील 59 वर्षीय महिला व डोंगरगाव येथील 21 वर्षीय तरुणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर धामणे येथील 27 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या महिलेला 23 जूनपासून श्वास घेण्यास त्रास होत होता तसेच इतर तक्रारी होत्या.

या महिलेला मधुमेह आणि हृदयविकाराच त्रास असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. 26 जून रोजी या महिलेला खासगी रुग्णालयातून तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची महिती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

मावळातील कोरोनाबाधितांची शहरी आणि ग्रामीण मिळून 80 रुग्ण संख्या झाली असून यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्य़ंत 41 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या 35 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून मावळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.